पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचा व्यवहार रद्द (फोटो- सोशल मीडिया)
जैन बोर्डिंग हाऊस जमीन प्रकरणात नवीन ट्विस्ट
या प्रकरणात धंगेकरांचे मंत्री मोहोळांवर गंभीर आरोप
गोखले बिल्डर्सकडून व्यवहार रद्द करण्याची मागणी
पुणे: गेले काही दिवस पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या व्यवहारावरून जैन समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून पुण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बोर्डिंग हाऊस जमीन पुण्यातील गोखले बिल्डर्सला विकण्यात आली होती. दरम्यान आता गोखले बिल्डर्सकडून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला एक ई-मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. विशाल गोखले यांनी ईमेल लिहीत जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्टीना जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. काही दिवस आधी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला स्थगिती दिली होती. या व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देखील देण्यात आले होते.
दरम्यान विशाल गोखले यांनी आपल्या ईमेलमध्ये आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे मला परत करावेत असा ईमेल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर या व्यवहारातून बाहेर पडत असल्याचे ईमेलमध्ये नमूद करण्यात आल्याचे समजते आहे.
दरम्यान बिल्डर विशाल गोखले यांच्या 230 कोटींचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांनी केवळ ईमेल केल्याने हा व्यवहार रद्द होत नाही. झालेल्या करारानुसार हा व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त गोखलेंचे पैसे देण्यास बांधील आहेत की नाहीत याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. दरम्यान धर्मादाय आयुक्त याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारातील 230 कोटी रुपये गोठवण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत ते काढता येणार नाहीत, असे आदेश देण्यात आल्याचे समोर येत आहे.
Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब
मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी एक ट्वीट केले आहे. यामुळे मोहोळ-धंगेकर वाद वाढण्याची शक्यता आहे. ” एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा” अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल १८ दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा…? हा प्रश्न आहे. स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्याने आता कुठल्या तोंडाने मी व्यवहार रद्द करतो, असं सांगू अशी अवस्था त्यांची झालेली आहे. परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देवो…. जैन मंदिराची बळकवलेली जागा ते लवकरात लवकर परत करो, असे धंगेकर म्हणाले.






