Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 30.09.2026
Maharashtra to World Breaking News :
ठाण्यातील मानपाडा भागात शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आशियाई खेळ २०२६ मध्ये भारतीय महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने विश्वविक्रमाशी बरोबरी करत देशाला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले.
अरबी समुद्रात आणि उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एमपीएससीने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ सह तीन प्रमुख परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा आणि मागील परीक्षांच्या गुणपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकन सैन्याने इराक मधील आपल्या सर्व लष्करी तळांवरून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून २ दशकांनंतर तेथील लष्करी मोहिमेचा शेवट झाला आहे. अमेरिकेने दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या आयातीवर भारतासह १९ देशांना शून्य-शुल्क (Zero-Tariff Waiver) सूट देण्याची घोषणा केली.
30 Sep 2026 09:45 AM (IST)
Igatpuri Rice Adulteration Scandal: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे परराज्यातून हलक्या दर्जाचा तांदूळ आणून त्यात मोठी भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करत भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. या भेसळयुक्त तांदळाची प्रसिद्ध इगतपुरी, घोटी व त्र्यंबकेश्वरच्या नावाने देशभर विक्री केली जात असल्यामुळे संपूर्ण तालुक्याची मोठी बदनामी होत असल्याचा दावा नाठे यांनी केला आहे. ग्राहकांची फसवणूक आणि तालुक्याची डागाळणारी प्रतिमा रोखण्यासाठी या रॅकेटची तातडीने सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
30 Sep 2026 09:35 AM (IST)
INDIA Bloc Opposition Meeting: नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे आज सकाळी ११ वाजता 'इंडिया' (INDIA) आघाडीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व खासदार सुप्रिया सुळे हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) सहभागी होणार आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अनुपस्थित राहून त्यांच्या प्रतिनिधीला पाठवत आहेत, तर तमिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेवर नाराज असलेला द्रमुक (DMK) पक्ष आणि आम आदमी पार्टी (AAP) यांनी या बैठकीपासून दुरावा ठेवल्याने विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
30 Sep 2026 09:25 AM (IST)
Asian Games 2026 Gold In Archery: जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. चिकिता तनिपार्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांचा समावेश असलेल्या भारतीय त्रिकुटाने अंतिम सामन्यात चीनवर २३८-२३४ अशी मात करत आपले आशियाई अजिंक्यपद कायम राखले. या दणदणीत विजयासोबतच भारतीय संघाने विश्वविक्रमाशी (World Record) बरोबरी साधत जागतिक तिरंदाजीत पुन्हा एकदा भारताचा दबदबा सिद्ध केला आहे.
30 Sep 2026 09:12 AM (IST)
Contempt Petition Against Sanjay Raut: न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींवर वादग्रस्त व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या गंभीर आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अवमान याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांच्या खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते अमित देशपांडे यांनी वकील शैलेन्द्र गंगाखेडकर यांच्यामार्फत ही याचिका सादर केली असून, आता या उच्च न्यायालयातील अवमान याचिकेवर पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
30 Sep 2026 09:05 AM (IST)
Agarkar Tenure Ends BCCI Selection Committee: गुवाहाटी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीला अध्यक्ष अजित आगरकर अनुपस्थित राहिल्याने सर्वात वरिष्ठ निवडकर्ते प्रज्ञान ओझा यांनी बैठकीची सूत्रे हाती घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतचा (BCCI) अजित आगरकर यांचा करार ४ ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे संपत असून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. क्रिकेट वर्तुळातील वृत्तानुसार, आगरकर यांच्यानंतर बीसीसीआय आता निवड समितीच्या अध्यक्षपदाची किंवा अधिक महत्त्वाच्या वरिष्ठ पदाची जबाबदारी प्रज्ञान ओझा यांच्याकडे सोपवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, भारतीय क्रिकेटच्या निवड समितीमध्ये आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.






