मराठवाड्यातही पाऊस
जालना : मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा सर्वाधिक फटका हा जालना जिल्ह्याला बसला आहे. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. अंबड आणि बदनापूरला पावसाने झोडपले. ग्रामीण भागांमध्ये पावसाचा मोठा फटका बसला असून, शेतात पाणी साचले आहे.
जालना, बदनापूर आणि अंबड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे बदनापूर आणि अंबड शहरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ रस्ते जलमय झाले. तर दुसरीकडे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच जालना जिल्ह्याचे वातावरण दमट होत. हवामान विभागाकडून जिल्ह्याला दोन दिवस ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मंगळवारी देखील जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पिकांचेही मोठे नुकसान; हवामान विभागाने म्हटले…
वर्धा जिल्ह्यातही पाऊस बरसला आहे. जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले. शेतात पाणी साचल्यामुळे पेरणीपूर्व कामांना विलंब होण्याची शक्यता आहे.
वाशिममध्ये भुईमूगचे नुकसान
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सोमवारी मुसळधार पावसाने चांगलचे झोडपून काढले. वाशिम जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पाऊस पडत असून, यामुळे भुईमूग, मूग, या उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागितीची कामे रखडल्याने खरीप पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे. सतत पाऊस होत असल्याने नांगरून ठेवलेली शेती पुन्हा तयार करण्याची वेळ येणार आहे.