अल्पवयीन मुलीचे लग्न लावून राजस्थानला पाठवलं, प्रसूतीसाठी अमरावतीत आली; रुग्णालयात ॲडमिट होताच... (File Photo : Bus Fire)
अमरावती : यवतमाळ येथे जात असलेल्या शिवशाही बसला बडनेरा ते यवतमाळ मार्गावर माहुली चोर गावानजीक अचानक आग लागली. शनिवारी (दि.22) दुपारी 3.50 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बसमधून 3 जण प्रवास करत होते. चालकाने वेळीच सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास अमरावती आगाराची शिवशाही बस (एमएच 06/ बिडब्यू- 0294) यवतमाळकडे भरधाव निघाली. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चोर माहुली गावाजवळ असताना दुपारी 3.50 वाजताच्या सुमारास बसच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे बसचालक व्ही. पी. ढोलवाडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ बस रस्त्याचे कडेला उभी केली आणि त्यानंतर चालक ढोलवाडे, महिला वाहक पी.एस. अलाटकर व बसमधील तीन प्रवाशांना खाली उतरले.
दरम्यान, शिवशाही बसच्या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे या घटनेची माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला. बडनेरा येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बसची आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत शिवशाही बस पूर्णत: जळून खाक झाली होती.
यापूर्वीही अनेकदा घडले अपघात
शिवशाही बस 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर धावली होती. तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. 29 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला होता. शिवशाही बस अनियंत्रित झाली व मार्गाच्या बाजूला उलटल्याने अपघात झाला. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले होते.
…म्हणूनच शिवशाहीच्या प्रवासाला नापसंती
लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो. एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. या सर्व बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर सुद्धा होत आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता जीवघेणा ठरणार की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण अनेकदा शिवशाही ब्रेक डाऊन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शिवशाही ब्रेक डाऊन होत असल्याचे प्रमाण अधिक असल्याच्या माहितीला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसच्या प्रवासाला नापसंती असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.