
फोटो सौजन्य सोशल मीडिया
१८ ऑक्टोबर रोजी कर्जत-नेरळ-माथेरान मार्गावर धावणाऱ्या मिनीबसने नेरळ येथील निर्धारित थांब्यावर हजेरी लावली नाही. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना अखेर टॅक्सीने प्रवास करावा लागला. दरम्यान, हीच मिनीबस हुतात्मा चौकातून माथेरानच्या दिशेने जात असल्याचे टॅक्सीमधील प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्रवाशांनी गाडी थांबवून चालक आणि वाहकाला जाब विचारला.
माथेरानसारख्या पर्यटनस्थळी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना स्वस्त प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एसटी महामंडळाकडून मिनीबस सेवा चालवली जाते. मात्र, जुन्या झालेल्या मिनीबस माथेरान घाटात वारंवार बंद पडत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. आठवड्यातून एक-दोन वेळा गाडी बंद पडत असल्याने प्रवाशांना घाटात पायपीट करावी लागते. सरकारने या मार्गासाठी दोन मिनीबस खरेदी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात एकच बस नियमितपणे धावत असल्याचे सांगितले जात आहे.
नेरळच्या थांब्यावर बस न नेण्याबाबत आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत जाब विचारला असता चालक आणि वाहकाने ज्येष्ठ नागरिकांना अवमानास्पद उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘गाडीला अपघात झाला तर जबाबदारी कोणाची?’ असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला होता.
या प्रकाराबद्दल माथेरान क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष गिरीश पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित चालक आणि वाहकाच्या वर्तनाचे व्हिडिओ तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.