महेंद्र वानखेडे, मीरा भाईंदर : मेट्रो नऊचे (Metro 9) काम प्रगतीपथावर सुरू असताना मीरा भाईंदर (Mira Bhaindar) शहरात अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच मेट्रो कामगारांकडून एका व्यक्तीवर क्रेन चढवण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना सोमवारी जे कुमार या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे एका कामगारांचा मृत्यू (Metro Worker’s Death) झाला आहे. पिलरवरून खाली पडून कामगाराला नाकावर गंभीर दुखापत झाली. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. मीरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मीरा भाईंदर शहरात दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो लाईन नऊचे सुरू आहे. मात्र मागील वर्षभरात मेट्रो ठेकेदार व कर्मचारी, अधिकारी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो नऊ या प्रकल्पात एक हजारपेक्षा अधिक कामगार काम करत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी ठेकेदाराकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मोहन मुसाद नामक एका कामगार पिलरचे काम करत असताना पडून त्याचा मृत्यू झाला. काम करत असताना त्यावेळी मोहनकडे जर सुरक्षित जॅकेट असते तर त्याचा जीव वाचला असता. मात्र मेट्रो ठेकेदार या गोरगरीब कामगारांची पिळवणूक करून काम करून घेत आहे.
[read_also content=”प्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग सुरु, ‘एकदा येऊन तर बघा’ चा मुहूर्त संपन्न https://www.navarashtra.com/movies/ekda-yeun-tar-bagha-movie-muhurt-program-nrsr-332423.html”]
यामध्ये अनेक बाल कामगार असल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण कामगारांची तपासणी करणे गरजेचे आहे. या घटनेने मेट्रो कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहनचा मृत्यू सुरेक्षा जॅकेट नसल्याने झाला असल्याचे समोर आले आहे. या मृत कामगाराला दोन मुले, पत्नी असून मूळचा बिहारचा आहे.मृत्यूला जबाबदार कोण ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणे यांनी केली आहे. मोहनच्या मृत्यू झाल्याच्या तीन ते चार तासांनी मेट्रो अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्य संजय मुसाद यांनी माहिती दिली. त्यामुळे कुटुंबातील सदस्य यांना माहिती देण्यास इतका उशीर का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
कुटुंबातील सदस्य संजय मुसाद यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास मॅनेजरचा फोन आला की मोहन पिलरवर चढून नट फिट करत असताना खाली पडला आणि नाकावर दुखापत झाली आहे. आपण लवकर या असे सांगण्यात आले. मी पोहोचण्याच्या अगोदर त्याचा मृत्यू झाला होता. मोहन यांचे कुटुंब बिहारला असल्याने मृतदेह बिहार मध्ये घेऊन जाण्यासाठी मेट्रो अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही तसेच मृत व्यक्तीच्या कुटूंबाला आर्थिक मदत करू, असे आश्वासन दिले आहे अशी माहिती कुटुंबातील सदस्य संजय मुसाद यांनी दिली.
या संदर्भात मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बागल यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत लवकरचं सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले.