सुमारे नव्वदच्या दशकात कोकणात वाहुन जाणारे पाणी बारमाही उपयोगात यावे म्हणुन राज्य शासनाने खोडोपाडी बांधलेले पाझर तलाव आजच्या घडीला गाळाने पुर्णत: भरल्याने पाणी साठवण क्षमताच संपुष्टात आली आहे. परिणामी धरण आहे उशासी पण कोरड मात्र घशाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे. या पाझर तलावामध्ये आता पाणीसाठाच होत नसल्याने ना शेतीला पाणी ना पिण्यासाठी पाणी अशी स्थिती कोकणवासियांवर ओढवली आहे.
कोकणात शेतीला प्रोत्साहन मिळावे व कोकणातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीकडे वळावे यासाठी शासनाने गावोगावी पाझर तलावांचे जाळे विनले. छोट्या छोट्या ओढ्यांवर हे पाझर तलाव उभारले गेले. त्यातुन कोकणातील भुजल पातळीही कमालीची वाढली होती. मात्र या पाझर तलावातील गाळ गेल्या तीस चाळीस वर्षात कधीही उपसला गेला नसल्याने आज हे पाझर तलाव पुर्णत: गाळाने भरले गेले आहे.
राजापूर तालुक्यातील सौंदळ बारेवाडी येथे शासनाने ९० च्या दशकात निर्माण केलेल्या पाझर तलावामुळे कोकणातील पहिली पाणी वाटप संस्था स्थापन झाली होती. या परिसरातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीची कासही धरली होती. मात्र काही वर्षातच या धरणात गाळ साचल्याने व पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिक पाइपमध्ये झाडांची मुळे जावुन ते पाइप खराब झाल्याने ही पाणी वाटप संस्था व बारमाही शेती करणारा शेतकरी काळाच्या पडद्याआड गेला.
राजापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत पाचल, तळवडे, परुळे, कोंड्ये, वाटुळ, ओझर, पांगरे, केळवली अशा अनेक गावांमध्ये शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन हे पाझर तलाव निर्माण केले आहेत. गेल्या दहा वर्षात कोकणात या सह्याद्री रांगांमध्ये बेसुमार होणारी जंगल तोड पाहता आज बहुतांशी डोंगर उघडे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहत येवुन ती या पाझर तलावात साचली आहे. सर्वच पाझर तलाव आज ८० ते ९० टक्के गाळाने भरल्याने पाणी साठवण क्षमताच संपुष्टात आली आहे. या पाझर तलावात गाळाचे साम्राज्य असल्याने पाणी पाझर तलावात अडवले जाण्याऐवजी ते वाहुन जात आहे.
याच कालावधीत शासनाने करोडो रुपये खर्च करुन कोकणातील डोंगर दऱ्यांमध्ये लघु पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत या पाझर तलावाची निर्मिती केली. मात्र शासनाच्या या लघु पाटबंधारे विभागाची अनास्था व दुर्लक्ष यामुळे या पाझर तलावातील गाळ उपसण्याचे कष्ट कोणीच घेतले नाहीत. हा गाळ उपसण्यासाठी ना जनतेतुन निधीची मागणी झाली की या लघुपाटबंधारे खात्याने त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले परिणामी आज हे सगळे पाझर तलाव गाळाने पुर्ण भरुन त्यांची पाणी साठवण क्षमता पुर्णत: संपुष्टात आली आहे.
कोकणातल्या डोंगर दऱ्यांमध्ये शासनाने निर्माण केलेल्या मात्र आज गाळाने भरलेल्या या पाझर तलावातील गाळ उपसला गेला तर या पाझर तलावांची पाणी साठवण क्षमता वाढेल. पर्यायाने कोकणातील भुजल पातळीत वाढ होऊन अनेक गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणावर मात करता येईल. त्यासाठी आता लोक उठावाबरोबरच राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे. या पाझर तलावामध्ये पाणी साचून राहिले तर त्या पाण्यावर कोकणातील शेतकरी बारमाही शेतीही करु शकेल व येथील तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध होईल.