नवी दिल्ली – तुम्ही एकेकाळी हाजी मस्तानसोबत आघाडी करून नवीन राजकीय समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मैं भी छोटा-मोटा हाजी मस्तान हूं. भविष्यात आघाडीसाठी विचार होऊ शकतो, असे संकेत खासदार इम्तियाज जलील यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना दिले.
सुभेदारी विश्रामगृहात इम्तियाज नामांतरविरोधी सर्वपक्षीय बैठकीसाठी आले होते. या वेळी कवाडेसुद्धा सुभेदारीत होते. ही माहिती मिळताच इम्तियाज यांनी प्रा. कवाडे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी कार्यकर्त्यांनी आघाडीविषयी विचारले असता, इम्तियाज यांनी होकार दिला.
औरंगाबाद नामांतराला विरोध करण्यासाठी इम्तियाज यांनी सुभेदारीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या वेळी कवाडे पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी कवाडे व इम्तियाज यांचा मोठा हार घालून सत्कार केला. त्या वेळी एका कार्यकर्त्याने सांगितले की, वंचितसोबत आघाडी झाली होती, तसा प्रयोग भविष्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत होऊ शकतो काॽ त्यावर इम्तियाज म्हणाले, तुम्ही एकेकाळी हाजी मस्तानसोबत आघाडी केली होती. मीसुद्धा छोटा-मोठा हाजी मस्तान आहे. भविष्यात आघाडीचा विचार होऊ शकतो. त्यामुळे आता एमआयएमसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडी होऊ शकते, अशी चिन्हे दिसत आहेत. प्रा. कवाडे यांना पत्रकार परिषदेत आघाडीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, कुणीही सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास आघाडी करू.