छगन भुजबळ (फोटो- ट्विटर)
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र ओबीसींमधून आणि सगेसोयरेची अंमलबाजवणी करूनच आम्हाला आरक्षण हवे असे जरांगे पाटलांची मागणी आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आपल्याला सर्वश्रुत आहे. नुकतीच जरांगे पाटील यांची नाशिकमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली पार पडली. यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे. भुजबळांनी जरांगे पाटलांच्या २८८ उमेदवारांच्या मुद्द्यवरून त्यांना टोला लगावला आहे.
मराठा समाजाला निवडणुकीपूर्वी ओबीसीतून तसेच सगेसोयरेंची अंमलबजावणी करून आरक्षण न दिल्यास राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे याबाबत जरांगे पाटील आपला निर्णय घेणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे याबाबतची भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.
छगन भुजबळ बोलताना म्हणाले, ”मनोज जरांगे पाटील तुम्ही २८८ उमेदवार उभे करा. त्याच्यासाठी त्यांना वेळ द्या. मला शिव्या देऊन काय फायदा? जर का तुमचे उमेदवार निवडून आले तर तुम्ही विजयी होणार. कदाचित तुम्ही मुख्यमंत्री होणार. पण मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या शाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच जरा वागणे सुधारले पाहिजे.” वरील प्रतिक्रियेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे छगन भुजबळांच्या या प्रतिक्रियेवर काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.