मीरा भाईंदर मध्ये पाण्यासाठी हाहाकार (फोटो- ai gemini)
मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण कडून रोजचे ८६ तर एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. मात्र एमआयडीसीने १२५ दशलक्ष लिटर पाणी २०३१ पर्यंत द्यायचे आहे. सध्या एमआयडीसी ११८ दशलक्ष लिटर इतके पाणी देते तर स्टेम प्राधिकरण ८३ ते ८४ दशलक्ष लिटर पाणी शहराला रोज पुरवते असा महापालिकेचा दावा आहे. रोजचे सरासरी २०२ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला मिळते. मंजूर कोट्यापेक्षा रोजच्या कमी होणाऱ्या पाणी पुरवठ्या मागे गळती तसेच प्रक्रिया आदी कारणे सांगितली जात आहे.
शहराची वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात चालणारी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे ह्यामुळे पाण्याची मागणी आधीच वाढती आहे. त्यातच इतक्या वर्षात नवीन पाणी पुरवठ्यात वाढ झालेली नसून राजकारणी आणि महापालिका सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भरवश्यावर अजून नागरिकांना आश्वासने देत आली आहे, त्यातच मीरा भाईंदर हे पाणी पुरवठ्याच्या धरणां पासून शेवटच्या टोकाला असल्याने पाणी कमी व कमी दाबाने मिळते. त्यामुळे एखाद दिवस शट डाऊन झाला तरी पाणी पुरवठा सुरळीत होण्यास ३ ते ४ दिवस जातात.
त्यातच या वर्षी पावसाळ्या नंतरचा कमी पाऊस, अलनिनो चा प्रभाव आणि ऑक्टोबर पासूनच पावसाने दडी मारली आहे. परतीचा पाऊस देखील त्यामुळे फारसा पडला नाही. त्यातच अलनिनोच्या प्रभावमुळे पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता शासन स्तरावरून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे असून बारवी धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत योग्य नियोजन करता यावे यासाठी आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून १० टक्के पाणी कपात राज्य सरकारने लागू केली आहे.
त्यानुसार स्टेम मार्फत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत अश्या १८ तासाकरिता तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी रात्री १२ पासून ते शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत एकुण ३६ तासाकरीता मिरा-भाईंदर शहरास होणारा पाणी पुरवठा बंद केला जात आहे.
परिणामी कपातीच्या अनुषंगाने एमआयडीसी कडून एरव्ही रोज मिळणाऱ्या सुमारे ११८ दशलक्ष लिटर पाण्या ऐवजी गेल्या शुक्रवारी केवळ १२ दशलक्ष लिटर आणि शनिवारी केवळ २७ दशलक्ष लिटर इतकेच पाणी आले. स्टेम प्राधिकरण कडून देखील एरव्ही ८३ ते ८४ दशलक्ष लिटर ऐवजी बुधवारी अवघे ३५ दशलक्ष लिटर पाणी आले.
एमआयडीसीच्या पाणी कपातीचा गेल्या १९ ते २५ ऑक्टोबर ह्या आठवड्याभराचा हिशोब केला तर ६३१ दशलक्ष लिटर पाणी आले आहे. वास्तविक गेल्या आठवड्यात सरासरी ११८ दशलक्ष लिटर रोज पाणी धरले तर आठवड्याचे ८२६ दशलक्ष लिटर इतके पाणी होते. त्याच्या १० टक्के कपात नुसार ८३ दशलक्ष लिटर पाणी वजा केले तर ७४३ दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र एमआयडिसीने ११२ दशलक्ष लिटर पाणी कमी दिल्याने केवळ ६३१ दशलक्ष लिटर पाणीच शहराला मिळाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एमआयडीसी कडून १० टक्के नव्हे तर १५ टक्के पेक्षा जास्त पाणी कपात केली जात आहे.
एमआयडीसी आठवड्याभरात सुमारे ८३ दशलक्ष लिटर पाणी १० टक्के प्रमाणे कमी देणे अपेक्षित आहे तसेच वेळच्या बाबतीत देखील एमआयडीसी जास्तकाळ पाणी पुरवठा खंडित करत आहे. आठवड्याभराचे तास नुसार १० टक्के कपातीचे धरले तरी सुमारे १८ तास पाणी पुरवठा खंडित राहिला पाहिजे. मात्र एमआयडीसी सलग ३६ तास पाणी बंद करत आहे.
एमआयडीसी पाणी आणि वेळेच्या बाबतीत १० टक्केव पेक्षा जास्त कपात करत असल्याने मीरा भाईंदरच्या नागरिकांना नाहक जास्त पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा तब्बल ७० ते ७५ तासांवर गेला. जेणे करून पाण्यासाठी अनेक भागात हाहाकार माजला असून दुसरीकडे खाजगी टँकर लॉबीने देखील पाणी पुरवठ्याचे दर हजार ते २ हजारांनी वाढवले आहेत.
Ans: मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण कडून रोजचे ८६ तर एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे.
Ans: रोजचे सरासरी २०२ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला मिळते.






