कोरेगांव : चार महिन्यांपूर्वी कोरेगांव शहरातील अण्णाभाऊ साठे नगरीत दिलेल्या भेटीवेळी केरसुणी उत्पादक महिलांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन या उद्योगाला आधार देण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला होता. आज प्रत्यक्ष त्या महिलांना केरसुणी उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल स्वखर्चातून देवून आमदार महेश शिंदे यांनी शब्द पाळल्याची प्रचिती कोरेगांवकरांना मिळाली.
अण्णाभाऊ साठे नगरीतील केरसुणी उत्पादक महिलांना कच्च्या मालाच्या ट्रकचे वितरण आज डॉ. प्रिया महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरेगांवच्या नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनिल बर्गे, कोरेगांव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, महिला बाल कल्याण समिती सभापती शितल संतोष बर्गे, नियोजन समिती सभापती वनमाला प्रदीप बर्गे, नगरसेविका स्नेहल आवटे, नगरसेवक परशुराम बर्गे, नगरसेवक सागर वीरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, कोरेगांव शहरातील अण्णाभाऊ साठे नगरीत गेल्या अनेक वर्षांपासून केरसुणी उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मागील दोन वर्षांपासून मात्र कोरोना लॉकडाऊन काळात या उद्योगाला घरघर लागली होती. उत्पादीत मालाला बाजारपेठ नाही, भांडवल नाही, कच्चा माल मिळत नाही अशा अनेक अडचणींमुळे या विभागातील महिला विस्थापीत झाल्या होत्या.
या सर्व महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन कोरेगांवच्या केरसुणी उत्पादनाला चांगल्या बाजारपेठेसह दर्जेदार व मुबलक कच्चा माल देईन, असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला होता. तो शब्द आज पूर्ण करत आंध्रप्रदेशातून कच्चा माल घेऊन आलेल्या ट्रकचे वितरण अण्णा भाऊ साठे नगरीतील केरसुणी उत्पादक महिलांना करण्यात आले.
त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये दिवाळीपूर्वीच जास्तीत जास्त केरसुण्यांचे उत्पादन करुन ते महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह कोल्हापूरच्या कण्हेरी मठात सुध्दा विक्रीसाठी पाठविण्याचा प्रयत्न करु असेही त्या म्हणाल्या.
सामान्य कुटुंबातील या महिलांना आमदार महेश शिंदे यांनी उद्योग निर्मितीसाठी दिलेले पाठबळ निश्चितच उपयोगी ठरणार असून, या केरसुणी उत्पादक महिलांना खऱ्या अर्थाने उद्योग आधार मिळाल्याची प्रतिक्रिया कोरेगांवचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी यावेळी बोलताना दिली.