पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा, आमदार प्रशांत ठाकूर यांची पावसाळी विवधनसभेत पुनर्मागणी
पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलन, पाठपुरावा आणि प्रशासकीय बैठकांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. या प्रकल्पाच्या विलंबामुळे प्रवाशांना व नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींवर लक्ष केंद्रित करत त्यांनी आज (२ जुलै) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे पुन्हा एकदा या विषयाची ठळकपणे मांडणी केली.
सभागृहात बोलताना आमदार ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल बस आगाराचे नूतनीकरण म्हणजे फक्त पायाभूत सुविधा नव्हे, तर प्रवाशांसाठी सुसज्ज व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याची अत्यावश्यक गरज आहे. या बसपोर्ट प्रकल्पाचा प्रारंभ २०१८ साली “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्वावर करण्यात आला होता. मात्र, गेल्या सात वर्षांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कंत्राटदाराने अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही, यामुळे प्रवाशांना स्वच्छतागृहे, बसण्याची सोय, छायाचित्र यांसारख्या प्राथमिक सुविधांसाठी देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला, काय काय पाहता येणार?
प्रशांत ठाकूर यांनी याआधी देखील आंदोलने, पत्रव्यवहार, बैठका व सभागृहात सूचना यामार्फत या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले की, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या बस आगाराला भेट दिली होती आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते, मात्र प्रत्यक्षात काहीही कार्यवाही झालेली नाही. हे दुर्लक्ष प्रवाशांच्या दैनंदिन हालअपेष्टांना कारणीभूत ठरत आहे.
पनवेल परिसर झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे या भागात सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि आधुनिक बस स्थानकाची गरज अधिकच तीव्र झाली आहे. बस चालक, वाहक आणि हजारो प्रवाशांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रकल्पाचे तातडीने काम सुरु करणे ही काळाची गरज आहे, असे ठाकूर यांनी स्पष्टपणे नमूद केले.
या संदर्भात तत्कालीन मंत्री दादाजी भुसे यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तरी देखील प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रकल्पावर तातडीने कार्यवाही करून नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करावी, ही आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे आग्रही मागणी आहे.
शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीची कार्यकारिणी समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाला एसआरएची स्थगिती
पनवेल परिसर झपाट्याने विकसित होत असताना नागरीकरणामध्ये मोठी वाढ पाहता पनवेलचे बस स्थानक सर्व सुविधायुक्त असावे, अशी मागणी होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी बस आगारात आंदोलनही केले होते. त्यानंतर कायम पाठपुरावा केला. आता पुन्हा एकदा हा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऐरणीवर आणत मार्गी लावण्यासाठी शासनाचे लक्ष केंद्रित केले.