फोटो सौजन्य - Social Media
पुण्यातील टीच फॉर इंडिया (TFI) वर्गात शिकलेला आयुष आपल्या भावंडांपेक्षा वेगळ्या वातावरणात वाढला. या वर्गाची खासियत म्हणजे शिक्षणाचा दृष्टिकोन! धडे पाठ करण्यापेक्षा शोधन, प्रयोग आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेणे. आयुषने येथे पुस्तकं वाचली, चर्चांमध्ये भाग घेतला, कला, नाटक, क्रिकेट आणि मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शिकला. त्याला स्वतःचे मत मांडण्याची, प्रश्न विचारण्याची आणि प्रकल्पांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्याचा सुरुवातीचा लाजाळूपणा हळूहळू नाहीसा झाला.
टीएफआय वर्ग आनंद, स्वातंत्र्य आणि शिकण्याचा उत्सव बनला होता. चुकांना घाबरण्याऐवजी विद्यार्थ्यांना त्या चुकांमधून शिकण्यास प्रवृत्त केलं जायचं. आयुषसाठी हे शिक्षण केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नव्हते, तर आत्मविश्वास वाढवणारी आणि जीवन समृद्ध करणारी प्रक्रिया होती. त्याच्या फेलोंनी केवळ शिकवले नाही, तर त्याचे विचारही ऐकले. त्यांनी त्याच्या संगीत, कविता आणि क्रीडा आवडींना प्रोत्साहन दिले. त्यांच्या विश्वासामुळे आयुषने मंचावर सादरीकरण करण्याचं आणि नवीन गोष्टी करण्याचं धाडस मिळवलं.
या प्रवासाचा परिणाम त्याच्या कुटुंबावरही झाला. आधी त्यांना वाटायचं की शिक्षण म्हणजे चांगले गुण. पण आयुषला कार्यक्रमांमध्ये आत्मविश्वासाने बोलताना आणि नेतृत्त्व करताना पाहून त्यांचा दृष्टिकोन बदलला. आता त्यांना समजलं की खरे शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती.
आपल्या फेलोंचा उत्साह व सर्जनशीलतेमधून प्रेरणा घेत आज आयुष स्वत: टीएफआय फेलो आहे. ‘हिम फॉर हर’ सारख्या प्रकल्पांनी त्याला लैंगिक समानतेबाबत आणि सर्व ओळखींचा आदर करण्याबाबत जाणीव करून दिली, ज्यामुळे त्याची सहानुभूती आणि सामाजिक बदलाप्रती कटिबद्धता अधिक दृढ झाली. आता वर्गामध्ये शिक्षक म्हणून तो संयम, उत्साह व सर्जनशीलतेसह मुलांच्या क्षमतेला चालना देण्याचा आनंद घेतो, अध्ययनाला धमाल व सर्वसमावेशक करतो. अधिक पुढे जात आयुषचे शिक्षक प्रशिक्षण मॉडेल्सवर काम करण्याचे स्वप्न आहे, ज्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण होऊ शकेल, ज्यासह शिक्षक प्रभावी व उत्साही अध्यापन पद्धतींसह सुसज्ज होतील. याव्यतिरिक्त, तो प्रत्यक्ष वर्गामध्ये सहभाग घेण्याप्रती कटिबद्ध आहे, त्याने त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणलेल्या त्याच संधींसह परतफेड करण्याचा निर्धार देखील केला आहे.
आयुषच्या कहाणीमधून सिद्ध होते की, शिक्षणाचे सक्षमीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार मिळतो, तसेच विद्यार्थी इतरांसाठी परिवर्तनकर्ते बनण्यास प्रेरित देखील होतात.