मुंबई – विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल काही नेत्यांनी तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातात विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला किरकोळ जखम झाली आहे. अपघाताबाबत अधिक माहितीसाठी नवी मुंबई पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला आता रसायनी (रायगड जिल्हा) पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अपघाताबाबत एकनाथ कदम याच्याकडून सविस्तर माहिती पोलिस घेतील. यासंबंधी त्याचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला तेथील सीसी टीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत.
मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदमने दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकने भरधाव वेगेत कारला हुल दिल्यामुळे हा अपघात घडला. कदम यांनी सांगितले, “आम्ही बीडवरून मुंबईला जात होतो. रस्त्यात एका ट्रकने आम्हाला हुल दिली. या ट्रकच्या बंपरमध्ये आमची कार अडकली. त्याच स्थितीत आमची कार काही अंतरापर्यंत फरफटत गेली. ही घटना पहाटे 5 च्या सुमारास घडली. पण मदत पोहोचण्यासाठी तासभर लागला. मी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी ६ च्या सुमारास रुग्णवाहिका आमच्यापर्यंत पोहोचली.”