कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. देशाच्या विकासासाठी मतदार हे महायुतीच्याच बाजूने उभे राहतील असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड विकासकामे ही जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचे सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहनही आमदार भोईर यांनी यावेळी केले.
पुढे ते म्हणाले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे. तो अधिकार आपण सर्वांनी बजावावा आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली भोईर, भाऊ प्रभूनाथ भोईर, सुप्रिया भोईर, वैभव भोईर आणि विशाखा भोईर या सर्व कुटुंबीयांनीही आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.