सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने सातारा शहरातील काही दुकानांना मराठी नावांच्या मुद्द्यावरून पुन्हा काळे फासण्यात आले. हॉटेल प्रीती एक्झिक्युटीव्ह परिसरातील काही दुकानांवर धडक काळे फासण्याची कारवाई सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार (Yuvraj Pawar) यांच्यासह 15 जणांची धरपकड केली.
महाराष्ट्रामध्ये सर्व आस्थापनांची नावे तसेच दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेतून असाव्यात या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही सातारा शहरातील व्यापारी दुकानदार यांच्याकडून या नियमाची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीने जिल्हा प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना निवेदन सादर केले होते आणि कठोर आंदोलनाचा इशारा दिला होता.
शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 ते 50 आंदोलकांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह परिसरातील काही दुकानांच्या पाट्यांना काळे फासले.
आंदोलनाची माहिती मिळताच सातारा पोलीस तत्काळ या परिसरात दाखल झाले. त्यांनी पवार यांच्यासह सुमारे 15 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी सातारा शहर पोलीस ठाण्यात केली. मात्र, जोपर्यंत सातारा शहरातील आस्थापनांच्या पाट्या संपूर्णपणे मराठीत होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिला.