कुर्डुवाडी : शेतमालाला नसलेला भाव, वाढलेली महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि या सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलणाऱ्यांना तरुंगात टाकण्याचे काम करणारे मोदी सरकार देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चालले असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
मोदींची कांदा निर्यातबंदी अन् शेतकऱ्यांचे नुकसान
शरद पवार म्हणाले, २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका करत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पन्नास टक्के महागाई कमी करण्याची भाषा बोलणाऱ्या मोदींच्या काळात पेट्रोल ७१ रुपयांवरून १०६ रूपयांवर गेले ४१० रूपयांचा गॅस ११६९ रूपयांवर गेला. टंचाईच्या काळात पाकिस्तानमधून कांदा आयात करणाऱ्या मोदींनी कांदा निर्यातबंदी केली आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले.
मोदींचे सरकार म्हणजे लबाडाचे आमंत्रण
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था बदलून टाकत राजधानीचा चेहरा बदलण्याचे काम केले असताना त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम या सरकारने केले. सामान्य माणसाचे अधिकार संकटात टाकणाऱ्या व दिलेला शब्द न पाळणाऱ्या मोदींचे सरकार म्हणजे लबाडाचे आमंत्रण आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन
खा. पवार म्हणाले, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या पंतप्रधानांनी देशाची लोकशाही टिकवण्याचे काम केले. ज्यांनी देशाचा विचार केला त्यांच्यावर टीका करणारे मोदी देशाच्या एकात्मतेचा विचार न करता लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल याचा विचार करत आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सीना माढा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी, या भागात वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी, भागातील प्रगती करण्यासाठी उमेदवाराला मताधिक्य द्यावे. आपल्या भागातील, जिल्ह्यातील विकासाची दृष्टीचा इतिहास असलेल्या मोहिते पाटील कुटूंबातील कर्तबगार धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सोलापूरला केळी संशोधन केंद्र उभा करणार
माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, २००९ पासून या जिल्ह्याला कारभारी राहीलेला नाही. उजनीच्या पाण्याचे सतराशेसाठ कारभारी झाल्याने पाण्याचे नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळत नाही. विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री असताना निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पुण्याकडील धरणातून १० टीएमसी पाणी उजनी धरणात आणून शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा पोहचू दिल्या नव्हत्या.
चौदा हजार कंटेनर केळी सोलापूर जिल्ह्यातून
महाराष्ट्रातून निर्यात केलेल्या चोवीस हजार कंटेनर पैकी चौदा हजार कंटेनर केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे, त्यामुळे भविष्यात सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभा करणार आहे. प्रत्येक तालुक्यात शेती प्रक्रिया उद्योग, मीनी एमआयडीसी, कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखाना, रेल्वे पूल, सीना माढा उपसा सिंचन योजनेचे अपुरे काम पूर्ण करायचे आहे.
यावेळी माढ्याच्या शिवाजी कांबळे, नगराध्यक्षा मिनलताई साठे,संजय कोकाटे,संजय पाटील घाटणेकर, उत्तमराव जानकर, नलिनी चंदेले धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव यांनी भाजप सरकारच्या धोरणांचा निषेध करत धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या मान्यवरांची उपस्थिती
सभेसाठी विजयसिंह मोहिते पाटील,बळीराम साठे, उत्तम जानकर, संजय कोकाटे, अभिजित पाटील, धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव, शिवाजी कांबळे, नलिनी चंदेले, दत्ताजी गवळी, दादासाहेब साठे, मिनलताई साठे, आनंद टोणपे, समीर मुलाणी, बाबूतात्या सुर्वे, सयाजी पाटील, आनंद कानडे, यांच्यासह तालुक्यातील कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट व मित्र पक्षांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन हरिदास रणदिवे यांनी केले.