5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी आजपासून हवामानाची दिशा बदलेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील आणि 5 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.राज्यात 5 जून रोजी मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. परंतु, तो कोकणातील देवगड आणि गोवा भागात 10 दिवस आधीच म्हणजे 25 मे रोजी दाखल झाला.
दुसऱ्या दिवशी 26 मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे वारे सक्रिय झाले. पहिल्या वादळी पावसाने मुंबई, ठाणे आणि पालघर पाण्यात बुडाले. तथापि, मंगळवारी विश्रांती घेतल्यानंतर, बुधवारी मान्सूनच्या वाऱ्यांनी पुन्हा आपली दिशा बदलली आणि रिमझिम पावसाने लोकांना भिजवले. हवामान शास्त्रज्ञांनाही हवामानाच्या या युक्त्यांमुळे आश्चर्यचकित केले. गत काही दिवसांत जारी केलेल्या लाल, नारंगी आणि पिवळ्या अलर्टनंतर हवामान विभागाने आपला अंदाज बदलला आहे. मुंबईतील ताज्या अपडेटमध्ये ठाणे, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 1 जूनपर्यंत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज व येलो अलर्ट दिला आहे.
हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला आहे. मात्र, आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रात पाच ते सहा दिवस पाऊस विश्रांती घेईल. उपग्रह आणि रडारवरून मिळालेल्या हवामान नमुन्यांवर आधारित 3, 5 आणि 7 दिवसांचे अंदाज तयार केले जातात. सध्या, आजपासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील आणि 5 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी घाई करू नका. 5 जून नंतरच पेरणी करण्याचा विचार करा, असा इशारा दिला आहे. पेरणीची घाई केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. लवकरच मान्सूनचा वेग मंदावेल आणि हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 5 जूनपर्यंत राज्यातील बहुतेक भागात कमी पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या 5 दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे 21 जणांचा मृत्यू झाला असून 12 जखमी झाले आहेत. त्यात पाण्यात बुडून, वीज कोसळून तसेच भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. काही प्राण्यांनाही याचा फटका बसला. तथापि, राज्याच्या वेळेच्या सुमारे 12 दिवस आधी आलेल्या मान्सूनमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे 41 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातील पिकांचा हाती-तोंडी आलेला घास निसर्गाने पळवला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Raigad News : माथेरानमध्ये अवतरला स्वर्ग; पावसामुळे हवेत पसरली धुक्याची चादर
आयएमडी मुंबईच्या संचालक शुभांगी भुते यांच्या मते, मान्सूनच्या कालावधीचा फार काही फरक पडत नाही. येत्या काही दिवसांत पावसातील चढ-उतार सुरूच राहतील. वाऱ्यांची दिशा कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. 5 जून नंतरच चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मुंबईत ऑगस्ट हा महिना सामान्यतः कोरडा मानला जातो. तेव्हा सर्वात कमी पाऊस पडतो तर जुलै हा पावसाचा महिना असतो. या महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. जून महिना हा मान्सूनच्या आगमनाचा महिना आहे.