File Photo : Shrikant Shinde
जळगाव : जिल्ह्यात पक्षाची संघनात्मक बांधणी चांगली आहे. लोकसभेत पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात उमेदवाराला मोठा लीड मिळाला आहे. त्यामुळे विधानसभेत आपले पाच आमदार निवडून येणारच. मात्र, त्यांचे मताधिक्य वाढले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी दोन महिने डोळ्यात तेल घालून कार्य करावे, असे आवाहन खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चमणराव पाटील, कशोर पाटील, लता सोनवणे उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना महिलांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. महिलासाठी पहिली कल्याणकारी योजना राबविण्यात आलेली आहे. मात्र, महिलांना या योजनेबाबत वारंवार आठवण करून देण्याची गरज आहे. त्यासाठी आगामी दोन महिने कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून कार्य करावे, असे शिंदे म्हणाले.
‘बंडखोरी’ची काळजी
आगामी विधानसभा निवडणूक भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट, व शिवसेना शिंदे गट एकत्र महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगून श्रीकांत शिंदे म्हणाले, कि जागा वाटप लवकरात लवकर ठरणार आहे. कोणत्याही मतदार संघात बंडखोरी होणार नाही याची तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेतृत्व घेतील.
‘योजना दूत’ व्हा !
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी योजना दूत म्हणून कार्य केले पाहिजे. त्यांनी शासनातर्फे महिला, मुले, वृध्द यांच्यासाठी असलेल्या योजनाबाबत व्यवस्थित माहिती जनतेला दिली पाहीजे. सर्व सामाजाला घेवून चालण्याविषयी त्यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघात समाजनिंहाय नेतृत्व देण्यात यावे. त्यात प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला स्थान देण्यात यावे.
राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार
राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की लोकसभेत आपल्या पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. विधानसभेतही चांगले यश मिळणार याचा विश्वास आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी गाफील न राहता काम करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.