
ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट (फोटो सौजन्य-ChatGPT)
मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल सेवा विस्कळीत झाल्या होत्या. महिलांच्या डब्यात साप असल्याची शंका व्यक्त होताच काही महिला प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंग केली. त्यामुळे सकाळी 9.14 ते 9.26 या वेळेत लोकल तब्बल 12 मिनिटे थांबवावी लागली.
ही घटना ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून लोकल सुटल्यानंतर घडली. अलार्म चेन ओढण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महिलांच्या डब्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणताही साप अथवा संशयास्पद बाब आढळून आली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी डबा पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर लोकल पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिलांमध्ये घबराट पसरली होती.
या घटनेचा मध्य रेल्वेच्या काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर किरकोळ परिणाम झाला. दरम्यान, प्रत्यक्षात डब्यात साप होता की ही केवळ अफवा होती, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या घटनेबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
ठाणे स्थानकावरील महिलांच्या डब्यात साप अफवांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, जंगलांवरील अतिक्रमण आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यामुळे वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. त्यामुळे अशा घटना केवळ अपघाती नसून पर्यावरणीय बदलांचे संकेत असल्याची चर्चा होत आहे.
मात्र, यासोबतच रेल्वेच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होतात. लोकलसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नियमित तपासणी, स्वच्छता आणि देखभाल ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे साप प्रत्यक्षात डब्यात होता की नाही, याची अधिकृत चौकशी होणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.