उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; बड्या नेत्याने हाती बांधलं घड्याळ
मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रत्नागिरीत मोठा धक्का बसला आहे. गेल्या 40 वर्षांपासून ठाकरे गटासोबत राहिलेले माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कदम यांनी वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यातील उघड संघर्षामुळे हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे रत्नागिरीतील उद्धव गटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत 40 वर्षे सक्रिय असलेले सचिन कदम यांची ओळख अनंत गिते आणि विनायक राऊत यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून होती. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपण सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सचिन कदम यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटात त्यांचा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय नेते आणि आमदार सोडून जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “मी बाळासाहेबांना वडील आणि पक्षप्रमुख म्हणून ओळखत होतो. ते ज्या पद्धतीने लढले, तसंच मीही लढणार. लढाई अर्धवट सोडून जाणाऱ्यांपैकी मी नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगलं होतं. उदय सामंत एकनाथ शिंदेंची साथ सोडणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. पण आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगत उदय सामंत यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तरही दिले होते. पण त्याचवेळी त्यांनी रत्नागिरीत ठाकरे गट फुटणार असल्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर सचिन कदम यांनी राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरीत ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गटातील नेते शिंदे गटाकडे येणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. त्यांच्यानुसार, उद्धव गटातील चार आमदार आणि तीन खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार आहेत. त्यांनी रत्नागिरीत याचा पहिला ट्रेलर दाखवणार असल्याचेही जाहीर केले. फक्त उद्धव सेना नव्हे, तर काँग्रेसलाही मोठा धक्का देणार असल्याचा दावा त्यांनी केला. रत्नागिरीत पक्षप्रवेशासाठी जय्यत तयारी सुरू असून, आगामी घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देणार असल्याचा इशारा दिला होता.. त्यांच्या मते, उद्धव सेनेतील जवळपास 450 कार्यकर्ते आज पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामध्ये तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशा विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश कार्यक्रम दुपारी 12 वाजता होणार आहे.