मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, शेवटची Metro रात्री..., जाणून घ्या वेळापत्रक (फोटो सौजन्य-X)
शारदीय नवरात्र उत्सव (Navratri 2024) गुरुवारपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (MMMOCL) नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी हा निर्णय जाहीर केला. सणाच्यासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी वाहतूक सेवेची वेळ वाढविणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी अधोरेखित केले.
नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येतील आणि दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा लाभ घेता येईल.
या निर्णयाबाबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो आणि सर्व भाविकांना व नागरिकांना कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची जबाबदारी आहे. मेट्रो ट्रेनच्या सेवा वाढवून आम्ही प्रवाशांना उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणाऱ्या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत.” दरम्यान महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या प्रवाशांना सर्वोच्च दर्जाच्या सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. वाढीव वेळा आणि अतिरिक्त मेट्रो सेवांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल.
अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली:
२३:१५ – ००:२४
२३:३० – ००:३९
२३:४५ – ००:५४
००:०० – ०१:०९
००:१५ – ०१:२४
००:३० – ०१:३९
गुंदवली ते अंधेरी (पश्चिम):
२३:१५ – ००:२४
२३:३० – ००:३९
२३:४५ – ००:५४
००:०० – ०१:०९
००:१५ – ०१:२४
००:३० – ०१:३९