मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकारांना प्रतिक्रीया दिली असून राज्य सरकाराचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार उघड केला म्हणून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करुन शिवसेनेकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, ‘सत्य समोर येईलच. पोलिसांचा आणि सत्तेचा गैरवापर करून तुम्ही जरूर माझ्यावर खोट्या केसेस दाखल करा. पण, माझा सवाल अजूनही तोच आहे नायर हॉस्पिटलमध्ये ते बाळ मृत्यूमुखी का पडलं? त्याच्या वडिलांचा मृत्यू का झाला? त्याची आई तिचा मृत्यू का झाला? नायर मध्ये त्या रुग्णाला योग्य सुविधा का मिळाली नाही? या प्रश्नांची उत्तरं द्या.
शेलार पुढं म्हणाले की, ‘या सर्व प्रश्नांचे उत्तर देता येत नाहीत म्हणून मी जे बोललोच नाही या वाक्याचा खोटा अर्थ लाऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय. मी जेकाही बोललो ते आजही सोशल मीडियावर आहे. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत याचा मी निषेध करतो. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. आता मी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरुद्धचा संघर्ष अजून कडवा करणार आहे.’ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
दरम्यान, नारायण राणें प्रमाणे शेलार यांनाही अटक केलं जाऊ शकतं अशा चर्चा असताना सध्या शेलार यांच्या निवासस्थाना बाहेर शेलार समर्थक व भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.






