भाजप आमदार प्रवीण दरेकर (फोटो- ट्विटर)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे मात्र देवेंद्र फडणवीस त्यांना ते करू देत नाहीत असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील हे सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसून येत आहेत. दरम्यान आपल्याला प्रवीण दरेकर व जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष देखील पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांना विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर जे आरोप केले होते, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात फडणवीसांची मोलाची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी जाहीर भूमिका घेतली. त्यात जर मी अडथळा आणला असेल तर राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी त्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जरांगे पाटलांचा खोटेपणा राज्यातील जनतेसमोर उघड झाला. खुर्चीचा मोह झाला असता तर देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला तयार झाले नसते. मराठा समाजासाठी जो काम करत आहे त्याला पश्चाताप का होईल? मनोज जरांगे पाटील तुमचा भंपकपणा उघड होतोय.
एकनाथ शिंदे –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना तसे करू देत नाहीत असा,आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला होता. यावर फडणवीसांना प्रश्न विचारला असता, मराठा समाजासाठी मी काय केले हे सर्वाना माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचे आणि मी त्यात अडथळा आणला असे सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे फडणवीस म्हणाले. याबाबत तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला पाहिजे असे देखील फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य केले आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले आहे. त्यावेळेस मी सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे फडणवीस मराठा समाजाला व त्यांना आरक्षण देण्यासाठी विरोध करतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामध्ये कसलेही तथ्य नाही. हा खोटा आरोप आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटलांकडून फडणवीसांवर होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.