मुंबईत काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं, Video व्हायरल
अमित शहा यांच्या संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद मुंबईतही आज उमलटे. मुंबईच्या काँग्रेस कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमंध्ये मोठा राडा झाला आहे.दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला. यादरम्यान परिसरात काहीकाळ तणाव पहायला मिळाला.
#WATCH | Maharashtra: BJP workers vandalise the Congress party office in Mumbai. They are protesting against the Congress party and are alleging that the Congress has insulted Baba Saheb Ambedkar. Police use lathi-charge to disperse them. pic.twitter.com/7NFz0XdVCC — ANI (@ANI) December 19, 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप कॉंग्रेस करत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आंबेडकरांचा कॉंग्रेसने अपमान केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप सुरू असताना मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयामसोर आंदोलन केलं.
भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या पोस्टरवर शाईफेक केली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या पोस्टरवरही शाईफेक करण्यात आली. यावेळी भाजपचे कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.
‘ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत. ते पक्षाने पोसलेले गुंड आहेत. आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याने आंदोलन करत होतो. आम्ही कोणाच्या अंगावर दगड भिरकावले नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र जर भाजपच्या कार्यकर्त्याकडून कार्यलयावर दगडफेक आणि खुर्च्या तोडल्या जात असतील. कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल. तर परिस्थिती गंभीर आहे. नागपूरमध्ये एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यादरम्यान परभणी आणि बीडमध्ये भयंकर घटना घडल्या आहेत’, अशी टीका कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
संसदेच्या हिवाशी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब यांचा कॉंग्रेसने कसा अपमान केला आहे, हे दाखवून देताना एक विधान केलं होतं. त्यावर कॉंग्रेसने आक्षेप घेत अमित शहांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या विधानाचे पडसाद देशभर उमटले आहेत. आज राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी निळ्या रंगाचे शर्ट घालत मार्च काढला.