देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut News: मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले तेव्हा सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढे केले होते. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे केले जात आहे. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? त्यांनी शेतकऱ्यांसमोर तरी जावे, प्रजेला सामोरे जायला हवे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
प्रजेच्या प्रश्नांना सामोरे न जाता आमच्या सारख्या राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. फडणवीसांनी शेतकऱ्यांना सामोरे न जाता बावनकुळेंना पाठवले जाते. त्यांच्या घोटाळ्याची प्रकरणे मी येत्या दोन दिवसांमध्ये बाहेर काढणार आहे, असा इशारा राऊतांनी दिला आहे. त्यांची संपत्ती विकली तरी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होईल, असा टोलाही राऊतांनी लगवाला.
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीना पप्पू ठरवण्यासाठी महाआघाडीने 30 हजार कोटी रुपये खर्च केले. पण आज राहुल गांधी ठामपणे उभे आहेत. राहुल गांधी विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी 100 जागा निवडून आणल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे या घोटाळ्यांमधून निर्माण झालेले बुडबुडे आहेत. आता ते आदित्य ठाकरेंनाही घाबरू लागले आहेत. आदित्य ठाकरेंनी मांडलेले मुद्दे तुमच्या जिव्हारी लागलेत, अशी टिका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नागपूरमध्ये बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू असताना फडणवीस मात्र गप्प का आहेत. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आंदोलन सुरू असतानाही फडणवीस तोंडाला पट्टी लावून बसले आहेत का? बच्चू कडू यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात कोणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, बेरोजगारीवर, मतदार यादीतील घोळावर आंदोलन केले, की त्यांना ‘अर्बन नक्षलवादी’ घोषित करण्याचे काम सरकार करत आहे.” अशी टिकाही त्यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, “आतापर्यंत बच्चू कडू हे फडणवीस यांच्यासोबत होते, आता ते शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले म्हणून त्यांना नक्षलवादी म्हणणे योग्य नाही. सातबारा कोरा करण्याची मागणी ही उद्धव ठाकरे यांनी केली आहे आणि त्याच मागणीसाठी बच्चू कडू लढा देत आहेत. मग शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवणे हे कुठल्या प्रकारचे लोकशाही आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Brazil Police News: रस्त्यांवर मृतदेहांचा खच…; ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये नेमकं काय झालं?
“मंत्रिमंडळात घोटाळे करणाऱ्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? तुमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीत मोठा आर्थिक घोटाळा सुरू असल्याची चर्चा आहे. तब्बल १५ ते २० हजार कोटी रुपयांच्या बजेटमधून मोठा हिस्सा गुजरातमधील ठेकेदारांना दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मराठी ठेकेदारांना ‘मेहरबानी’ म्हणून केवळ छोटी-मोठी कंत्राटे देण्याची योजना आखण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली काम सुरू असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली अनावश्यक विकासकामे करून शेतकऱ्यांवर आणि नागरिकांवर अन्याय केला जात आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम सुरू आहे, पण त्याची गरज नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या घरे आणि दुकाने पाडली जात आहेत. त्यामुळे अनेक जण बेरोजगार होत आहेत.”
“हे शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून उपोषणावर आहेत. सोलापुरातही शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्यात शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत, पण त्यांना भेटायला सरकारकडून कुणालाही वेळ नाही. राज्यात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. विरोधक आवाज उठवतात तेव्हा त्यांना दडपण्याचे काम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर विरोधक दुर्बिणीतूनही दिसू नयेत, अशी भाषा सरकार वापरत आहे. आंदोलक आणि विरोधकांना संपवण्यासाठी कायदे करण्याचे काम हे सरकार करत आहे.”






