गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
Ganeshotsav 2026: मुंबईतील बहुचर्चित गणेशोत्सव २०२६च्या नियोजनाला आता वेग येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मंगळवारी, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. नाना चौक येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही बैठक होणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या काळात वाहतूक, गर्दीचे नियोजन, सुरक्षा, स्वच्छता आणि आपत्कालीन यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
यंदाचा गणेशोत्सव सोमवार, १४ सप्टेंबर ते शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेश मंडप, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुका होणार आहेत. गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन देणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने संयुक्त बैठक घेण्यात येत आहे.
बैठकीला मुंबईतील गणपती मंडळे आणि समन्वय समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील नगरसेवक, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, मुंबई महापालिकेच्या डी विभागातील संबंधित अधिकारी
अग्निशमन दल, BEST, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, ग्राहक सेवा केंद्राचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
गणेशोत्सव काळात मुंबईतील वाढणारी गर्दी लक्षात घेता BEST बसच्या फेऱ्या वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या आणि धावण्याची वेळ वाढवण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक फिरती शौचालये उपलब्ध करून देण्याच्या नियोजनावरही चर्चा होईल.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक समुद्रकिनाऱ्यांवर येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे आणि समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता प्रभावीपणे राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही बैठकीत मांडला जाणार आहे.
तसेच समुद्रात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अधिक संख्येने जीवरक्षक/सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याबाबत चर्चा होणार आहे.
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, वीजपुरवठा आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या सूचना, अडचणी आणि आवश्यक मार्गदर्शन प्रशासनासमोर मांडावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.






