'३१ डिसेंबर'प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी (Photo Credit - X)
नेमकी अडचण काय?
निवडणूक प्रक्रियेत मतदान साहित्याचे वाटप, ते जमा करणे आणि अंतिम अहवाल सादर करताना कर्मचाऱ्यांना मध्यरात्री १ ते २ वाजेपर्यंत काम करावे लागते. तसेच, मतदानाच्या दिवशी प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी पहाटे ५ वाजताच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, या वेळेत मुंबईतील लोकल, बेस्ट आणि मेट्रो सेवा मर्यादित किंवा बंद असतात. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचणे किंवा घरी परतणे कठीण होणार आहे.
३१ डिसेंबरचा दाखला देत प्रशासनाला सवाल
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. “जर ३१ डिसेंबरच्या उत्सवासाठी प्रशासन मध्यरात्रीपर्यंत विशेष वाहतूक सेवा देऊ शकते, तर लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी (निवडणुकीसाठी) अशा सुविधा देणे का अडचणीचे ठरते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रिया रात्रंदिवस राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघटनेने निवडणूक आयोग, राज्य सरकार, रेल्वे आणि परिवहन विभागाला पत्र लिहून खालील मागण्या केल्या आहेत. १४ आणि १५ जानेवारी रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवावी. १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी पहाटे लवकर रेल्वे फेऱ्या सुरू कराव्यात. याच कालावधीत बेस्ट बस आणि मुंबई मेट्रो सेवादेखील अधिक वेळ सुरू ठेवण्यात यावी. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या कार्यात कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष वाहतूक व्यवस्था जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.






