
मान्सूनपूर्व महा मुंबई मेट्रो अलर्ट मोडवर; २,४९६ सीसीटीव्ही अन् २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवर आराखडा लागू
मुंबई : वसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) महा मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर तंत्रज्ञानाधारित पावसाळी सज्जता आराखडा कार्यान्वित केला आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंडित मेट्रो सेवा मिळावी, या उद्देशाने ही तयारी करण्यात आली आहे. यावर्षी मेट्रो मार्गिका २ब आणि ९ या मार्गिका सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे महा मुंबई मेट्रोला चार मार्गिकांची विशेष तयारी करण्याचे आदेश एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी दिले आहेत. मेट्रो स्थानके, डेपो, व्हायाडक्ट आणि संबंधित मेट्रो पायाभूत सुविधांवर प्रवासी सुरक्षा, पाणी साचण्याची समस्या, आपत्कालीन प्रतिसाद, पायाभूत संरक्षण आणि विविध यंत्रणांशी समन्वय यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
मान्सून कृती आराखड्याअंतर्गत ३९ कार्यरत मेट्रो स्थानकांवर प्रत्येकी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे आधीच कार्यान्वितअसून, मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर एकूण २,४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्यापक देखरेख जाळे तयार करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांद्वारे प्रवाशांची हालचाल, स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि महत्त्वाच्या ऑपरेशनल भागांवर २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.
पाणी साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणी ३० आपत्कालीन पंप तैनात करण्यात आले आहेत. स्थानके, डेपो आणि व्हायाडक्टवरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची गाळ, झाडाझुडपे आणि अडथळे दूर करून साफसफाई करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचू नये, यासाठी कार्यरत उन्नत मार्गाची साफसफाईही पूर्ण करण्यात आली आहे. मेट्रो नेटवर्कवरील १,०७० इन्सुलेटरची प्रतिबंधात्मक तपासणी आणि देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच २५ केव्ही केबल्स, पँटोग्राफ, करंट ट्रान्सफॉर्मर्स, ट्रान्सफॉर्मर्स, आणि लाइटनिंग अरेस्टर्स (वीज चमकल्यावर नुकसान टाळण्यासाठी) यांची तपासणी व देखभाल करण्यात आली आहे. ट्रॅक्शन सब-स्टेशन्ससाठी पूर संरक्षण उपाययोजनाही अधिक बळकट करण्यात आल्या आहेत.
रिअल-टाइम हवामान निरीक्षणासाठी १४ महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजणारी अॅनिमोमीटर यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्गिका २अ वरील दहिसर पूर्व, डहाणूकरवाडी, वळणई, गोरेगाव पश्चिम आणि अंधेरी पश्चिम; मेट्रो मार्गिका ७ वरील राष्ट्रीय उद्यान, पोईसर, आरे, जोगेश्वरी पूर्व आणि गुंदवली; तसेच मेट्रो मार्गिका २ब आणि ९ वरील मानखुर्द, शिवाजी चौक, दहिसर आणि काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांवर छतामधून पाणी गळती, प्लॅटफॉर्मवरील पाणी निचरा आणि पाणी अडकण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अर्थिंग स्थानकांवर अर्थ रेसिस्टन्स मोजणी, उपकरणांची स्थिती तपासणी आणि नियमित देखभाल पूर्ण करण्यात आली आहे, ज्यामुळे पावसाळ्यातील सुरक्षितता अधिक मजबूत होईल.
ऑपरेशन्सच्या दृष्टीने अनपेक्षित परिस्थितीसाठी देखील राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुख्य मार्गिकेवर तीन राखीव मेट्रो आणि डेपोमध्ये दोन मेट्रो ठेवण्यात आल्या असून, अशा एकूण पाच राखीव मेट्रो गाड्या उपलब्ध राहतील. वीजपुरवठा खंडित होणे किंवा अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी पर्यायी यंत्रणाही तयार ठेवण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीस संवादासाठी हेल्पलाईन क्रमांक
टोल फ्री : १८०० ८८९ ०५०५ / १८०० ८८९ ०८०८
आपत्कालीन संपर्क : ८४५२९०५४३४ / ८६५२६३५३०१
अद्ययावत पावसाळी एसओपीनुसार प्रवासी संवाद व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस, पाणी साचणे आणि सेवा अद्यतनांसंबंधी सूचना डिजिटल डिस्प्ले बोर्ड, स्थानकांवरील घोषणा प्रणाली आणि मोबाइल अॅप्सद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचवल्या जातील. फ्लेक्स बॅनर्स, सैल सेफ्टी नेट्स, असुरक्षित साहित्य आणि वाऱ्यामुळे धोकादायक ठरू शकणाऱ्या वस्तूंची पाहणी करून त्यांना सुरक्षित करण्यात आले आहे. मेट्रो परिचालनावर परिणाम करू शकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणीही करण्यात आली आहे.
२५ मे ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी २४x७ आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष आपत्कालीन समन्वय, तक्रार नोंदणी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि राज्य शासनाच्या विभागांशी संपर्कासाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल. ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात या नियंत्रण कक्षात विशेष नोडल टीम कार्यरत राहील. पावसाशी संबंधित कोणतीही घटना घडल्यास नियमानुसार एका तासाच्या आत अहवाल सादर केला जाईल.
महत्त्वाच्या आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला आवश्यक साधनसामग्री पोहोचविण्यासाठी विशेष मेट्रो डब्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपरिक पावसाळी तयारीसोबतच एमएमआरडीएने मेट्रो परिचालनात प्रगत तंत्रज्ञान आणि एआय-आधारित यंत्रणांचा वापर सुरू केला आहे. यामुळे सुरक्षा, पूर्वानुमानाधारित देखभाल, परिचालन कार्यक्षमता, महसूल व्यवस्थापन आणि प्रवासी अनुभव अधिक सक्षम होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश हे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे केंद्र आहे. प्रत्येक ऋतूमध्ये शहराची गती कायम ठेवण्यासाठी सक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. पावसाळा हा शहराच्या पायाभूत सुविधांची खरी कसोटी असतो. त्यामुळे नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह राहावी, यावर आमचा भर आहे. मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ साठी एमएमआरडीएने केलेली तयारी ही भविष्याभिमुख, तंत्रज्ञानाधारित आणि प्रवासी-केंद्रित पायाभूत सुविधांप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेचे उदाहरण आहे. एआय-सक्षम प्रणाली, २४x७ देखरेख, पाणी साचू नये यासाठीच्या उपाययोजना आणि समन्वित आपत्कालीन प्रतिसाद यांच्या माध्यमातून मुंबईचे मेट्रो नेटवर्क पावसाळ्यातही विश्वसनीय सेवा देण्यासाठी अधिक सक्षम केले जात आहे.”
“पावसाळ्यात सुरक्षित आणि अखंडित मेट्रो सेवा देणे ही महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीएची प्रमुख प्राथमिकता आहे. मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर सीसीटीव्ही देखरेख, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, नियंत्रण कक्ष आणि पाणी साचू नये यासाठीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. एआय-आधारित ऑटोमेटेड पॅन्टोग्राफ कंडिशन मॉनिटरिंग प्रणालीमुळे तांत्रिक बिघाड आता काही सेकंदांत ओळखता येतो. त्यामुळे मुसळधार पावसातही मेट्रो सेवांची विश्वासार्हता आणि गाड्यांची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.”अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
“महा मुंबई मेट्रोसाठी एमएमआरडीएची पावसाळी रणनीती तीन स्पष्ट उद्दिष्टांवर आधारित आहे, प्रवासी सुरक्षा, सेवा सातत्य आणि जलद प्रतिसाद. यंदा ही तयारी अधिक महत्त्वाची आहे, कारण मेट्रो मार्गिका २ब आणि ९ या त्यांच्या पहिल्या परिचालन पावसाळ्याला सामोऱ्या जात आहेत. त्यामुळे २४x७ देखरेख, पाणी निचरा व्यवस्था, आपत्कालीन पंप, स्टँडबाय गाड्या, वाऱ्याचा वेग निरीक्षण, स्थानक तपासणी आणि एआय-सक्षम पूर्वानुमानाधारित देखभाल अशा प्रत्येक स्तरावर सज्जता वाढविण्यात आली आहे. तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स आणि प्रत्यक्ष अभियांत्रिकी उपाययोजनांच्या एकत्रित वापरामुळे संभाव्य धोके लवकर ओळखणे, जलद प्रतिसाद देणे आणि सेवा व्यत्यय कमी करणे शक्य होते. ‘मुंबई इन मिनिट्स’ ही संकल्पना पावसाळ्यातही सुरक्षित आणि सुरळीतपणे पुढे नेणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.” अशी प्रतिक्रिया एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.