सौजन्य फोटो - AI Gemini
Mumbai Local Train News: मुंबईतून एक अत्यंत विचित्र आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. विनातिकीट प्रवास पकडल्या गेलेल्या एका महिलेने कारवाईचा राग मनात धरून थेट महिला तिकीट तपासनीसावर (TC) जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी रेल्वे स्थानकात घडली आहे. या हल्ल्यात महिलेने टीसीला मारहाण करत थेट त्यांच्या हाताला चावा घेतल्याने रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हरप्रीत कौर असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिला टीसीचे नाव असून त्या पश्चिम रेल्वेमध्ये डेप्युटी चीफ तिकीट इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
हरप्रीत कौर या बुधवारी सकाळी वांद्रे स्थानकातून विरार लोकलच्या महिला द्वितीय श्रेणी डब्यात तिकीट तपासणीसाठी चढल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोकल अंधेरी स्थानकात आल्यानंतर, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फलाट क्रमांक सहावर उतरवण्यात आले. यावेळी एका महिलेकडे तिकीट नसल्याने हरप्रीत यांनी तिला ५१० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. सुरुवातीला महिलेने कॅश नाही असे सांगत क्यूआर कोड मागितला. मात्र, कोड दिल्यानंतरही तिने पैसे न पाठवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर हरप्रीत यांनी तिला पकडून फलाट क्रमांक ६-७ वरील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) चौकीत आणले. तिथे तिने अखेर ऑनलाइन दंड भरला.
दंड भरल्यानंतरही त्या महिलेच्या मनात प्रचंड राग होता. तिने चौकीतच हरप्रीत कौर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खांद्यावर मारहाण करत शर्ट पकडला आणि हाताला नखांनी बेछूट ओरबडले. आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यानंतर तिने कळस गाठत थेट हरप्रीत यांच्या हातावर जोरात चावा घेतला आणि तिथून पळ काढला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी हरप्रीत यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून पळून गेलेल्या महिलेचा कसून शोध घेतला जात आहे.
Ans: विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि ५१० रुपये दंड भरावा लागल्याच्या रोषातून एका अज्ञात महिलेने महिला टीसी हरप्रीत कौर यांच्यावर हल्ला केला.
Ans: महिलेने टीसीला शिवीगाळ केली, त्यांच्या हाताला नखांनी ओरबडले आणि थेट त्यांच्या हातावर चावा घेऊन तिथून पळ काढला.
Ans: जखमी टीसींवर उपचार करण्यात आले असून, रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन पेमेंटच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे.






