Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश
साई सावंत, उल्हासनगर
Devendra Fadnavis : रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उल्हासनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या एका दाम्पत्यावर त्यांची नजर गेली व त्यांनी आपला ताफा थांबवला. हे दाम्पत्य होते, SMA Type 1 या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या यशश्री चितळकरचे आई-वडिल.
आपल्या मुलीच्या उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी चितळकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली. मुख्यमंत्र्यांनीही संवेदनशीलता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी चितळकर कुटुंबियांना मदतीचे निर्देश दिले.
यशश्रीला SMA Type 1 हा दुर्मिळ आणि गंभीर आजार झाला आहे. तिच्यावरील उपचारासाठी तब्बल तब्बल ११ कोटी रुपयांची गरज आहे. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी तिच्या आई-वडिल संघर्ष करताना दिसत आहेत. ट्रस्ट, मंदिर व दानशूर व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे.
काहीही करून आपल्या लेकीला या आजारातून बरं करायचं असा निश्चिय त्यांनी केला असून दिवस-रात्र ते आर्थिक मदतीसाठी तहान भूक विसरून धडपड करत आहेत.
यशश्रीच्या आई-वडिलांच्या प्रयत्नांना यश येत आहे, पण आतापर्यंत मदत मोहिमेत दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून फक्त 51 लाख रुपयेच जमा झाले आहेत. म्हणजेच अद्याप त्यांना साडे दहा कोटींची नितांत गरज आहे. ती रक्कम खूप मोठी वाटत असली तरी देव काही तरी मार्ग काढेल या आशेने त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.
मुख्यमंत्री उल्हासनगरला येणार असल्याचे कळताच त्यांनी सकाळपासूनच रखरखत्या उन्हात आपल्या लेकीसह त्यांची वाट पाहिली. मुख्यमंत्र्यांनीही सहानभूती दाखवत आपला ताफा थांबवला व त्यांच्या कडून यशश्रीच्या आजाराबाबत माहिती जाणून घेतली.
त्या काही मिनिटांमध्ये यशश्रीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्याजवळील कागदपत्रासमवेत आवश्यक असलेली मदत आणि सद्य परिस्थिती मांडली. मुख्यमंत्र्यांनीही परिस्थिती जाणून घेत तातडीने यशश्रीच्या उपचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ताफा थांबवून या कुटुंबाची भेट घेतल्याने यशश्रीच्या उपचारासाठी मदतीची आशा निर्माण झाली आहे.
Ans: यशश्रीला SMA Type 1 हा दुर्मिळ आणि गंभीर आजार झाला आहे.
Ans: उल्हासनगर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून यशश्रीच्या आई-वडिलांची भेट घेतली.
Ans: यशश्रीच्या उपचारांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.






