मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका 'या' तारखेला होणार (फोटो सौजन्य-X )
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 10 जागांवरील निवडणूकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकतील. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणूकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आज मतदार केंद्रासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून पुढील प्रशिक्षण १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रसाद कारंडे म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व स्तरातून सहकार्याची आवश्यकता असून निवडणुकीची तारीख 25 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव गट (यूबीटी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे. उद्धव सेनेची विश्वासार्हता पणाला लागली असतानाच भाजप शिंदे सेनेशी लढण्याचा प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.
विद्यापीठाच्या गेल्या सिनेट निवडणुकीत अविभाजित शिवसेनेची सत्ता होती. तेव्हा भाजप आणि अविभाजित शिवसेनेची युती होती, मात्र आता शिवसेनेत दोन गट पडल्याने ही निवडणूक रंजक बनली आहे. शिवसेनेचा शिंदे गट भाजपसोबत आहे, तर शिवसेनेचा उद्धव गट आता महाविकास आघाडीसोबत आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेले अविभाजित शिवसेनेचे जवळपास सर्व सिनेट सदस्य यावेळी उद्धव गटाच्या पाठीशी आहेत.
विद्यापीठाच्या दहा सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. यापैकी पाच जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत, तर उर्वरित पाच जागा एससी, एसटी, ओबीसी आणि इतर प्रवर्गासाठी राखीव आहेत.
सीनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या असणार हे पाहणं पण तितकचं महत्त्वाचे ठरणार आहे. सिनेट निवडणुकीत जो बाजी मारेल त्या मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे.