bus (फोटो सौजन्य- pinterest)
मुंबई: मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन असलेल्या बेस्टने खर्चात कपात करण्यासाठी स्वमालकीच्या बस खरेदी न करता भाडेतत्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला. परंतु नवीन बस बेस्टच्या ताफ्यात येण्याचे प्रमाण कमी आहे. बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या १०० बस आयुर्मान संपल्याने एप्रिल महिन्यात भंगारात निघणार आहेत. तर दुसरीकडे, चालकांचे प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने ताफ्यात येऊनही नवीन बस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे मे महिन्यात मुंबईकरांचा त्रास आणखी वाढणार आहे. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बस आहेत. पाच कंत्राटदारांकडून मुंबईतील विविध मार्गावर भाडेतत्वावरील बस चालविण्यात येतात.
देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक
सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ७४३, तर भाडेतत्त्वावरील दोन हजार ७४ बस आहेत. बेस्टच्या ताप्यातील स्वमालकीच्या बसची संख्या ११ डिसेंबर २०२४रोजीच्या ९९३ वरून, १ एप्रिल २०२५ रोजी ७५९वर आली आहे. त्यातच, एप्रिलमध्ये बेस्टच्या मालकीच्या १०० बसचे आयुर्मान संपत आल्याने त्या टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जाणार आहेत. त्यामुळे बसची संख्या आणखी कमी होईल. त्याच वेळी, दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बस अद्याप पोत विना वापर उभ्या आहेत.
कुर्ला येथील अपघातानंतर ८४ बस आगारातच उभ्या
बेस्ट उपक्रमाने गेल्या वर्षी २३ मे रोजी निविदा प्रक्रिया राबवून, दोन हजार १०० इलेक्ट्रक सिंगलडेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीला दिले होते. यातील ३२५ हून अधिक बस ताफ्यात आल्या आहेत. त्याशिवाय, आणखी ८४ बस दाखल झाल्या आहेत. मात्र कुर्ला येथील बेस्ट बस अपघातानंतर चालकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी एक महिना करण्यात आल्याने, भरती प्रक्रिया व प्रशिक्षण कालावधीमुळे ८४ बस विविध मार्गांवर चालविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या बस आगारातच उभ्या आहेत.
वर्षअखेरपर्यंत आणखी ७०० बसना निरोप
नोव्हेंबर २०२५ पर्यंत ७०० नॉन एसी बस टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जाणार आहेत. जून २०२५ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील ९० मिडी बसनाही निरोप दिला जाणार आहे.