देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक (Photo Credit- Social Media)
मुंबई : मुंबईकरांचे देशी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षण आहे. मात्र, हेच मुंबईकर आपल्या वस्तू, सामान विसरण्यात संपूर्ण देशात आघाडीवर आहेत. मुंबईकरांनंतर विसरभोळेपणात पुणेकरांचा तिसरा क्रमांक आहे. टॅक्सीसेवा देणाऱ्या उबरने जाहीर केलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड इंडेक्स’ अहवालानुसार ही माहिती उजेडात आली आहे.
अॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबरमध्ये वस्तू विसरण्यामध्ये मुंबईकरांनी अव्वल स्थान मिळवले आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड इंडेक्स’ अहवालानुसार, टॅक्सीचा वापर करताना वस्तू विसरणाऱ्या देशातील पाच अग्रक्रमांकाच्या शहरांची यादी उबरने प्रसिद्ध केली आहे. यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे बॅग, इअरफोन, फोन, पाकीट, चावी अशा नेहमीच्या वस्तूंसह लग्नाची साडी, 25 किलो तुपाचा डबा, स्वयंपाकाचा स्टोव्ह, सोन्याचे एक बिस्कीट अशाही वस्तू मुंबईकर विसरले आहेत.
विसरलेल्या वस्तू
बॅकपॅक/बॅग, इयरफोन/स्पीकर, फोन, वॉलेट/पर्स, चष्मा/सनग्लासेस, चावी, कपडे, लॅपटॉप, पाण्याची बाटली, पासपोर्ट. वन प्लस विसरल्याचे दिसून येते. रात्री ६ ते ८ या वेळेत सर्वाधिक वस्तू विसरल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही लाल रंगाच्या वस्तूंचे किंवा लाल रंगाचे आवरण असलेले आणि त्यानंतर निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश आहे, अशीही अहवालात नोंद आहे. विसरलेल्या मोबाइलमध्ये सॅमसंग कंपनीच्या फोनची संख्या सर्वाधिक आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू विसरणाऱ्यांचे प्रमाण अधिक
सामान्य दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू विसरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यात, शनिवारी सर्वांत जास्त वस्तू विसरण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 असल्याचेही समोर आले आहे.
वेगळ्या कोणत्या वस्तू विसरल्या?
25 किलो गाईचे तूप, व्हीलचेअर, बासरी, हेअर विग, स्टोव्ह, लग्नाची साडी, सोन्याचे बिस्कीट, टेलिस्कोप, हवनकुंड यांसारख्या वेगळ्या वस्तू विसरल्याचेही समोर आले आहे.