निवडणूक आयोगाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्रातील एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि.३१) प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार नोंदींमधील २ कोटींहून अधिक मतदारांचे नाव या यादीत नाही. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुनरीक्षणापूर्वी राज्यात ९७८५४०४९ मतदार होते. यापैकी ७७१६५५६२ नावांचा मसुदा यादीत समावेश करण्यात आला आहे.
मसुदा यादीत नावे समाविष्ट न होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये मतदार दिलेल्या पत्त्यावर न सापडणे, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे, मृत्यू, इतरत्र पुनर्नोंदणी आणि इतर कारणांचा समावेश आहे. प्रारूप अथवा मसुदा यादीत तुमचे नाव नसणे म्हणजे तुमचा मतदानाचा हक्क गमावला आहे असे नाही. पात्र मतदार ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे आणि आक्षेप दाखल करू शकतात. नवीन पात्र मतदारांसाठी फॉर्म ६, आक्षेपांसाठी फॉर्म ७ आणि मतदार यादीतील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ उपलब्ध आहे.
दरम्यान, उपलब्ध अधिकृत दस्तऐवजात मसुदा यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांची लिंगनिहाय माहिती दिलेली आहे. सोबत जोडलेल्या अधिकृत परिशिष्ट-२ मध्ये, वगळण्यात आलेल्या किंवा समाविष्ट न करता आलेल्या २०६८८४८७ मतदारांची स्वतंत्र पुरुष-महिला माहिती दिलेली नाही.
4 नोव्हेंबरला अंतिम यादी
दावे आणि आक्षेपांवर प्रक्रिया केल्यानंतर, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर, २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगाच्या या माहितीनुसार, प्रक्रियेसाठी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी अधिकारी आणि ७,००० हून अधिक सहायक अधिकारी कार्यरत आहेत.
नाव कुठं शोधावं?
नव्या यादीत नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन नाव शोधावे लागणार आहे. त्यातच तुम्हाला नाव आहे की नाही याची माहिती मिळेल. जर नसेल तर यावर हरकत नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का
सातारा जिल्ह्याच्या मतदार यादीत (Satara Voter List) विशेष सखोल पुनरीक्षणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होताच तब्बल ३ लाख ४१ हजार ९२५ मतदारांचे गणना प्रपत्रच उपलब्ध झाले नसल्याचे समोर आले. यामध्ये १ लाख ९१ हजार ३८३ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर तब्बल ८८ हजार ४९० मतदार मृत असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीच्या अचूकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.






