नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता (फोटो- ट्विटर)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. दरम्यान महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा विरोध करून नवाब मलिक हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना मुंबईतील शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून तिकीट दिले आहे. मात्र निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना त्यांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. तसेच भाजप नवाब मालिकांचा प्रचार करणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. मात्र भाजपच्या विरोधाला झुगारून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नवाब मळीक यांनी जोरदारपणे प्रचार सुरू केला आहे. मात्र आता त्यांच्या जामीन रद्द करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ते अनेक महीने तुरुंगात होते. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय कारणांमुळे जामीन मंजूर केला होता. तसेच याचा वापर केवळ वैद्यकीय कारणांसाठीच केला जावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर मलिक यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र आता हीच याचिका रद्द करावी अशी मागणी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
वैद्यकीय जामीन मिळाला त्यामधील नियमांचे मलिक यांच्याकडून पालन होत नसल्याचे या याचिकेत सांगण्यात आले आहे. नवाब मलिक हे वैद्यकीय जामीनाचा वापर चुकीच्या प्रकारे करत असल्याचे यात म्हणण्यात आले आहे. नियमित जामीन मिळेपर्यंत त्यांचा वैद्यकीय जामीन सुरू असणार आहे. सध्या नवाब मलिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक ठिकाणी ते प्रचार करत आहेत. हा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वैद्यकीय जामीनाचा गैरवापर आहे, असे याचिकेत सांगण्यात आले आहे. त्यामुळे मलिक यांचा नियमित जामीनाचा अर्ज फेटाळून लावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
हेही वाचा: Ajit Pawar News: नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध…? अजित पवारांचे सूचक विधान
नवाब मलिक यांच्यावर काय म्हणाले अजित पवार?
जसं आजपर्यंत अनेक नेत्यांवर आरोप झाले तसेच नवाब मलिकांवरदेखील झाले. पण आजवर ते सिद्ध झालेले नाहीत. नवाब मलिक यांना शिक्षाही झाली होती. देश स्वतंत्र झाल्यावरही अनेक नेत्यांवर आरोप झाले, ज्यांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले ते राजकारणातून बाजूला झाले. पण ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत असे नेते आज मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले. वेगवेगळ्या पदांवर पोहचल्याचं आपण अनेकदा पाहिल आहे.