Photo Credit- Social Media (
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता चर्चा सुरु आहे ती ठाकरे बंधूंच्या भेटीची. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे बंधू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत एका लग्न समारंभात भेट झाली, मागील काही आठवड्यांमधील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोघांमधील राजकीय मतभेद मिटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राजकीयदृष्ट्या वेगळे असलेले हे दोन्ही भाऊ रविवारी संध्याकाळी अंधेरी येथे सरकारी अधिकारी यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकत्र दिसले. लग्न समारंभात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांनी रश्मी ठाकरे यांना राज ठाकरेंसोबत बोलताना कैद केले.
दोन्ही पक्षांची अस्तित्वाची लढाई
गेल्या दोन महिन्यांत दोन्ही भावांची सार्वजनिक भेट होण्याची ही तिसरी वेळ होती, त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्याच्या अटकळांना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेना सोडली. पुढील काही महिन्यातच ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला.
20 जागांवर समाधान
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेने (यूबीटी) अवघ्या 20 जागांवर समाधान मानावे लागले. तर मनसे स्वतंत्र निवडणूक लढली होती, त्यांना एकही जागा मिळाली नाही. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. मुंबईतील आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक महत्वाची मानली जात आहे.
डिसेंबर महिन्यातही झाली भेट
१५ डिसेंबर २०२४ रोजी ठाकरे बंधूंना मुंबईतील ताज लँड एंड येथे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात पाहिले गेले. यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही भाऊ दादर येथील राजे शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात भेटले होते. आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अंधेरी येथे महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरे यांनी केवळ अनौपचारिक संवाद साधला नाही तर हास्यविनोद करताना दिसले. या सर्व घडामोडीनंतर राजकीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.