फोटो सौजन्य:गुगल
वाढलेल्या फ्लेमिंगोचं नेमकं कारण काय ?
फ्लेमिंगो काय करतात तर खाडीकिनारी प्रदुषणामुळे जे काही शेवाळ्यासारखा थर निर्माण होतो ते फ्लेमिंगोचं अन्न. जेवढं प्रदुषणामुळे हा थर पाण्यावर किंवा किनाऱ्याला साचतो तिथे फ्लेमिंगो जास्त येतात. म्हणजेच खाडीकिनारी जितकं जास्त प्रदुषण जेवढे जास्त फ्लेमिंगो आणि हेच कारण आहे. ठाणे,मुंबई आणि नवी मुंबई खाडीकिनारी येणाऱ्य़ा फ्लेमिंगोचं. सध्याच्या काही वर्षात फ्लेमिंगो वाढत चालले पण इतर पक्षी मात्र हळूहळू कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचा समतोला राखला जात नाही.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे माजी सहायक संचालक डॉ. राजू कासंबे यांनी या समस्येबाबात दुख व्यक्त केलं आहे. “मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात पक्ष्यांची संख्या सर्वाधिक घटण्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे खाडीतील प्रदुषण आणि खारफुटीची झाडं नसणं. कासंबे सांगतात की, “सुशोभीकरणाच्या नावाखाली लहान तलाव, पाणथळ जागा आणि परिसराचे काँक्रिटीकरण केलं जातं. त्यामुळे होतं काय तर पक्षांना हवं तसं पोषक वातावरण मिळत नाही. शहरात फक्त कावळा, कबूतर आणि सीगलसारखे काही पक्षी टिकून आहेत. याचं कारण म्हणजे लोक त्यांना काही ना काही अन्नाचा तुकडा खायला घालतात किंवा हे पक्षी उष्टी खरकटी खाऊन जगतात म्हणून शहरात इतर पक्षांच्या तुलनेत कावळा, कबूतर आणि सीगल दिसतात तरी. पण बाकी पक्षी कालबाह्य होण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे.
नवी मुंबईला एका समृद्ध शहरी परिसरात रूपांतरित करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. प्रत्येक नवीन इमारतीच्या उभारणीमुळे, प्रत्येक नवीन रस्त्याच्या निर्मितीमुळे, पूर्वीच्या पर्यावरणात काहीतरी बदल, फेरफार किंवा विनाश झाला आहे. शहरीकरण आणि वन्यजीव एकत्र नांदू शकतात का, या प्रश्नाचे उत्तर नाही असं आहे, ते अशक्य आहे म्हणून नाही, तर इतर वन्यजीव राहावे असा प्रयत्न होत नाही म्हणून.ठाणे-ऐरोली-वाशी खाडी प्रणालीच्या दोन्ही बाजूंना संरक्षक खारफुटीची जंगले आहेत. यामुळे वन्यजीव काही अंशी तग धरुन राहतात.खारफुटी काय करतं तर भरती-ओहोटीचे पाणी शोषून घेतात आणि शहरांमधील पूराचा धोका टळतो.
सरकारचा कानाडोळा
वाढते पुरावे, नामशेष होत असलेल्या प्रजाती, आटत चाललेली पाणथळ जागा आणि अडवलेला भरती-ओहोटीचा प्रवाह, या सर्व गोष्टी असूनही, यबाबतच्या सरकारी योजना फार तर कमी किंवा नाहीचेत. जेव्हा वृक्षारोपण मोहीम राबवली जाते, तेव्हा त्यात अनेकदा परदेशी झाडं किंवा, शोभेच्या प्रजातींना प्राधान्य दिले जाते, ज्या स्थानिक पक्ष्यांसाठी कोणत्याही प्रकारे अनुकूल नाहीबांधकाम व्यावसायिक पर्यावरणीय फायद्यासाठी नव्हे, तर केवळ सुशोभिकरणासाठी झाडे लावतात. पण यात होतं काय तर पोषक माती किंवा तसं वातावरण त्या झाडांना मिळत नाही. पण लोकांच्या लक्षात येत नाही. फक्त वृक्षरोपण करुन फायदा नाही तर पर्यावरणातील इतर घटकांचा देखील विचार करणं आवश्यक आहे.
एक वेळ होती जेव्हा शहरीकरण झपाट्याने वाढलं नव्हतं आणि त्यावेळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील खाडी किनारी अनेक पक्षांचं दर्शन व्हायचं. मात्र आता खाडीकिनारी फक्त केमिकलच्या पाण्याची दुर्गंधी येते. शहरीकरणामुळे केवळ पक्ष्यांची संख्या कमी झाली नाही, तर त्याने मुंबईतील पक्षीजीवनाचे स्वरूपच बदलून गेलं. आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एके काळी सहज दिसणारा तांबडा पाणकोंबडा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राखाडी पाणकोंबडा (Ashy Woodswallow), पांढऱ्या मानेचा सुतारपक्षी (White-naped Woodpecker), हृदयाच्या आकाराचे ठिपके असलेला सुतारपक्षी (Heart-spotted Woodpecker) ही नावे आता शहरीकणामुळे कालबाह्य होताना दिसत आहेत.






