‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय...,' 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा बंडखोर खासदारांनी आज (सोमवार, 22 जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, या सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकनाथ शिंदेनी यावेळी संजय राऊतांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत ,”आपल्याकडे ट्रिपल संजय आहेत, ट्रिपल संजय असल्याने कुणाची गिनती नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले.
सहा बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर उपस्थितांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज सहा खासदार आपल्या कुटुंबात सहभागी झाले आहेत. ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय बंडू जाधव, संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर आपल्यासोबत आले आहेत. आपल्याकडे ट्रिपल संजय आहेत. आमच्याकडे चौथा संजय राठोडही आहे. भरपूर संजय आहेत. त्यामुळे बाकी कुणाबद्दल बोलण्याची गरज नाही. ट्रिपल संजय असल्याने कुणाची गिनती नाही,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
यावेळी शिंदे यांनी शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक परिवार असल्याचे सांगितले. “खऱ्या शिवसेना परिवारात, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कट्टर शिवसैनिक आणि खासदार सहभागी झाले आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो,” असे ते म्हणाले.
चार वर्षांपूर्वी 22 जून 2022 रोजी झालेल्या बंडाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, “त्यावेळी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला होता. सुरुवातीला 40 आमदार आमच्यासोबत आले. आता पुन्हा एकदा मोठा राजकीय षटकार मारला आहे. हा आपल्या लढ्याचा दुसरा टप्पा आहे.”
पुढे बोलताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भर दिला. “आपला संघर्ष हा सत्तेसाठी नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे. त्याच विचारांवर विश्वास ठेवून हे खासदार आज शिवसेनेत दाखल झाले आहेत,” असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या घडामोडींवर ठाकरे गटाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






