धनंजय मुंडे यांना द्यावा लागणार मंत्रिपदाचा राजीनामा; स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याची माहिती (Photo Credit- Social Media)
मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्याचे नागरी व अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (3 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सुमारे 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा नेमका तपशील समोर आलेला नाही.या भेटीचे नेमके कारण समोर आले नसले तरी, या बैठकीत मुंडेंनी राजीनामा सुपूर्द केला का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे किंवा महायुती सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वाढता राजकीय दबाव आणि या चर्चांच्या पार्श्वभूमीवर लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
गुजरातच्या गीर अभयारण्यात PM मोदींची जंगल सफारी; वन्यजीव संवर्धनाचे सांगितले महत्त्व
दरम्यान रविवारी करुणा शर्मा मुंडे यांनी दावा केला होता की, धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा देतील. इतकेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा आधीच घेतला आहे, असाही मोठा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) हा आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना सलग बोलताना अडचण येत आहे. त्यामुळे, हेच कारण पुढे करत ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? यावरही वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
सरकार आणि मुंडे गप्प – प्रतीक्षेत राजकीय वर्तुळ
विरोधकांनी आधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप धनंजय मुंडे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पुढील काही तासांत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा तापली असताना, करुणा शर्मा मुंडे यांनी मोठा दावा केला आहे.
महिलांच्या छेडछाडीपासून धनंजय मुंडेंपर्यंत..; सरकारला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांचे ‘ते’ 11 वार
रविवारी त्यांनी स्पष्ट केले की, मी 5 मार्चपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात उपोषणाला बसणार होते. पण सूत्रांनी मला माहिती दिली की, दोन दिवस आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे.त्यांच्या मते, धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते. मात्र, अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि तो सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर केला जाईल.
याच पार्श्वभूमीवर, “3-3-2025 को राजीनामा होगा” अशी पोस्टही करुणा मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली होती, त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरोखरच सादर होणार का, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. आता सर्वांच्या नजरा महायुती सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत.