संग्रहित फोटो
नागपूर : प्रेमसंबंध तोडल्यानंतरही (Love Relationship) लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या तरुणाची प्रेयसीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी चाकूने भोसकून हत्या (Murder in Nagpur) केली. हा थरार अजनी ठाण्यांतर्गत घडला. निखिल शाहू उके (वय 29 रा. रमानगर, 85 प्लॉट) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
हिमांशू प्रदीप मून (वय 29 रा. रमानगर), विशाल उर्फ काल्या लक्ष्मण फुलमाळी (वय 22 रा. कौशल्यानगर) आणि अंकित नीलेश वाघमारे (वय 25) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. निखिल हा रिलायन्स फ्रेशमध्ये नोकरीला होता. हिमांशू त्याच्या दूरच्या नात्यात आहे. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे- जाणे होते. हिमांशूच्या बहिणीसोबत निखिलचे प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांनाही याची माहिती होती आणि त्यांचे लग्नही ठरले होते.
काही दिवसांपूर्वी निखिलचा प्रेयसीशी वाद झाला. त्यामुळे प्रेयसीने त्याच्याशी सर्व संबंध तोडत लग्नास नकार दिला. त्यानंतरही निखिल तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. प्रेयसीने भाऊ हिमांशू याला याबाबत सांगितले. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हिमांशूने निखिलला फोन करून भेटायला बोलावले.
दोघांमध्ये वाद झाला अन्…
हिमांशूच्या घरासमोरच दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. हिमांशूने त्याला बहिणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पुन्हा त्रास दिल्यास परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा इशारा दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हिमांशू आणि त्याच्या मित्रांनी मिळून निखिलवर चाकूने हल्ला केला. पोट, छाती आणि पाठीत चाकू भोसकून रक्ताच्या थारोळ्यात सोडून ते सर्व फरार झाले.
उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल, पण…
निखिल मदतीसाठी हिमांशूच्याच घरी गेला. त्याच्या कुटुंबीयांनी निखिलचे कुटुंब आणि मित्रांना घटनेची माहिती दिली. त्याला उपचारार्थ वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. पण त्याच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे निखिलचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. हिमांशूवर जुना मारहाणीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.