पुणे / दीपक मुनोत : विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असतानाच, राज्यात इंडिया प्रणित महाविकास आघाडीला, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) घवघवीत यश मिळाल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तब्बल दहा वर्षानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) आमुलाग्र बदल होत असल्याने त्यांना नैराश्यातून बाहेर येण्याची संधी प्राप्त झाली आहे.
देशात २०१४ साली नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या हातातून निसटली. त्या पाठोपाठ २०१७ मध्ये महापालिका, जिल्हा परिषद ते पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही बहूतांश ठिकाणी तत्कालीन भाजप शिवसेना युतीचा विजय झाला.
वाढती बेरोजगारी, महागाई, नोटबंदी, जीएसटीची सदोष अंमलबजावणी आदींच्या पार्श्वभूमीवर २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत, आपल्या बाजूने फासे पडतील असे वाटत असतानाच ʻपुलवामा बालाकोटʼच्या रूपाने राष्ट्रवादाचा तडका बसला आणि मोदी सरकारचे पुनरागमन झाले. आणि विरोधीपक्षाच्या कार्यकर्त्यांचा वनवास लांबला. दरम्यानच्या काळात महापालिका ते जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही लांबल्या त्यामुळे नैराश्यात वाढच झाली.
याच कालावधीत, अंमलबजावणी संचलनालय (ईडी), आयकर विभाग (आयटी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) या तत्सम केंद्रीय यंत्रणा राहूल गांधींपासून ते थेट गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत हात धुवून मागे लागल्या. उध्दव ठाकरे सरकार पडले. तशातच, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, काँग्रेस पक्षाची बँकखातीही गोठवली गेली. तिकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आले. अशोक चव्हाणही गेले. अशा एकामागून एक घटनांमुळे आधीच नैराश्याच्या गर्ततेत गेलेल्या कार्यकर्त्यांचे अक्षरश्: अवसानच गळाले.
या पार्श्वभूमीवर, प्रचंड बेरोजगारी, इंधन – सिलींडर अन्य वस्तुंची महागाई, इलेक्टोरल बाँडचा घोटाळा आदींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुका, समान संधी (लेवल प्लेयिंग फील्ड) मिळून लढवल्या जातील का, अशी भिती व्यक्त करण्यात येत होती.
कार्यकर्ते सुखावले
इतके सर्व मळभ भरून आले असतांना, इंडियाप्रणित महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्याने राज्यातील विरोधी कार्यकर्ते सुखावले असून आगामी विधानसभां निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्साह निर्माण झाला आहे. त्यानंतर,आता सत्तेचा वनवास नक्की संपेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
मोहिते पाटलांचा मार्ग अवलंबणार ॽ
राज्यातील वजनदार नेते विजयसिंह पाटील यांच्या कुटूंबातील काही सदस्यांनी पाच वर्षापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून भाजपचा मार्ग चोखाळला. मात्र,यंदा ऐन लोकसभा निवडणुकांपुर्वी माहिते पाटील परिवराची ʻघरवापसीʼ झाली. विशेष म्हणजे, त्यांनी इडी, आयटी , सीबीआय यासारख्या तपासी यंत्रणांचीही तमा बाळगली नाही.
या संधीचा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुरेपुर फायदा उठवत, राज्यात निवडणुकीचे ʻनरेटीवʼ बदलवण्यात यशस्वी झाले. त्यांना शिवसेना, काँग्रेस, आप, कम्युनिष्टसह सर्व विरोधकांनी पुरेपूर साथ दिली. परिणामी, ʻचारशे पारʼच्या गोड गुलाबी स्वप्नात मश्गुल असलेल्या सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड देण्यात विरोधक यशस्वी झाले.