नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा(फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : नागपूर विमानतळाच्या ग्राउंड फील्ड प्रकल्पासंदर्भात आज हस्तांतरण प्रक्रिया होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याधुनिक विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली असून, जीएमआरच्या माध्यमातून नागपूरला अत्याधुनिक विमानतळ मिळणार आहे. कार्गो हबचा प्रकल्प अनेक वर्षांपासून राबविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, या प्रकल्पासाठी विमानतळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असताना तो मागे राहिला होता. अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ अर्थव्यवस्थेला मोठी चालना देतात. त्यामुळे शेतकरी, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या विधानावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ‘कोणाचेही घर बॉम्बने उडवण्याची भाषा आम्ही खपवून घेणार नाही. तसेच कोणीही अशा पोकळ धमक्यांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणी धमक्या देत असेल, तर पोलीस त्याला योग्य ते उत्तर देतील,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण
दुसरीकडे, सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ ०.१३ टक्के ग्राहकांवर लागू होते. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.






