संग्रहित फोटो : नाना पटोले
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भाजप-महायुतीचा विजय झाला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या महाविकास आघाडीचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसचा अवघ्या 16 जागांवर विजय झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
हेदेखील वाचा : One Nation One Election : भारतात पहिल्यांदा एक देश एक निवडणूक कधी झाली? का बंद झाली? वाचा सविस्तर
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर असताना सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळवले. त्यानंतर हीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असे म्हटले जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळाले नाही. काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावे लागले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. या सर्व पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी सांगितले की, ‘आपण पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता पक्षाचे हायकमांड निर्णय घेणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाला संघटनात्मक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती’, असा दावा पक्षाच्या सूत्रांनी केला होता. मात्र, आपण राजीनामा दिला नसल्याचे पटोले यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. अफवा पसरवल्या जात आहेत.
ही नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल या नावांची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्यासह इतर काही नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.