'सरकारच्या भरवशावर राहू नका, सरकार ही विषकन्या..,' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठं विधान (फोटो सौजन्य-X)
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. अगदी राजकारण्यांसह अधिकाऱ्यांनाही ते फटकरताना दिसतात. पुन्हा एकदा नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांबाबत केलेल्या विधानाची चर्चा होताना दिसत आहे. सरकार ही ‘विषकन्या’ असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या विदर्भात गुंतवणुकीच्या अभावावर गडकरी नागपूरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा, सरकार ही विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते…
गडकरी पुढे म्हणाले की, अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. सरकार ही विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते. त्यामुळे उद्योजकांनी यांच्या लफड्यात पडू नये. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या. पण सबसिडी कधी मिळेल याचा काही भरवसा नाही. माझ्या मुलाने सांगितले की, 450 कोटी रुपये अनुदान मिळालं आहे. मुलाने विचारलं की अनुदान कधी मिळणार. त्याला म्हटलं देवाला प्रार्थना कर. कारण काही भरवसा नाही की अनुदान मिळणार की नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेमुळे इतर क्षेत्रातील सबसिडी देण्यास विलंब होऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, 21-65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना 2.5 लाख रुपयांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेसह प्रति महिना 1,500 रुपये दिले जातील. या उपक्रमामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक ४६,००० कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. कापड उद्योग बंद पडले, त्यांना वीज सबसिडी मिळाली नाही… कापड उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे… मी त्यांना रोज भेटायचो… अडचण अशी आहे की आपण नियोजन करावे.
विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत, पण अपेक्षित यश मिळत नसल्याची खंतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विदर्भात ५०० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नाही, असं नितीन गडकरींनी म्हटलं.