कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली (संग्रहित फोटो)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता ग्राफिक डिझायनरावर कोर्टाबाहेर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांचा उजवा पाय व उजवा हात मोडला असून, डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या जवळील दीड लाख रुपये रोख, मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे लुटण्यात आली आहेत. ग्राफिक डिझायनरवर हा हल्ला मागील आठवड्यात झाला.
शहरातील औरंगपुरा परिसरातील रहिवासी ग्राफिक डिझायनर अजीम साहेबलाल शेख (वय 30, रा. अजीम कॉलनी, जुना बाजार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते आपल्या वडिलांच्या जामीन अर्जासाठी उच्च न्यायालयात गेले होते. दिवसभर कोर्टात काम आटोपून संध्याकाळी सुमारे सव्वासहाच्या सुमारास ते न्यायालयाच्या गेटजवळून सेवान हिलकडे निघाले.
याचवेळी मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर अजून ४ व्यक्ती घटनास्थळी आले व एकूण ६-७ जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये बुरख्यातील दोन-तीन महिलाही शिवीगाळ व मारहाणीमध्ये सहभागी झाल्या.
दरम्यान, मारहाण करताना ‘बहुत केस लढ़ रहा है, तु तु खतम, केस खतम’ असे म्हणत होते. त्याचदरम्यान एका हल्लेखोराने त्यांच्यावर रॉडने वार केला. या मारहाणीत फिर्यादीचा उजवा पाय व हात फ्रॅक्चर झाला. डोळ्याला इजा झाली तसेच डोक्याला मुका मार लागला. त्यांच्याकडील दीड लाख रुपये, मोबाईल व महत्वाची कागदपत्रे हिसकावून नेण्यात आली.
नागरिकांसह पोलिस घटनास्थळी
घटनेदरम्यान नागरिक व दोन ट्राफिक पोलिस घटनास्थळी जमा झाले. त्यांनी अजीम शेख यांना ऑटो रिक्षामध्ये बसवून तातडीने खासगी रुगणालयात उपचारासाठी नेले. सध्या तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनिल म्हस्के करीत आहेत. यामध्ये शेख अनीस शेख नीजाम, अफसर खान फीकर अहमद खान, अबुजर खान, अरबाज अफसर खान, साहेब खान पठाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.