सौजन्य - नवराष्ट्र टीम
पंढरपूर/नवनाथ खिलारे : स्वस्त धान्य दुकानातील रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे बऱ्याच वेळा निदर्शनास आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३० सप्टेबर) धाड टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळ मोकळ्या जागेत रेशनचे धान्य वितरण करणाऱ्या सहा ट्रक उभ्या होत्या. यामधील दोन ट्रकमधून खासगी पिकपमध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरला जात असल्याचे निदर्शान आले. शासकीय नियमानुसार रेशनचे धान्य शासकीय गोदामातून शासकीय गाडीमध्ये भरूनच रेशन दुकानापर्यंत पोहोचवले जाते, मात्र काळाबाजार करण्याच्या हेतूनेच शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी रेशनचे धान्य खासगी गाडीत भरले जात होते. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना कमी धान्य देऊन त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीत नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे. अशा परिस्थितीती पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी रेशन धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
१००० टन धान्याचे बेकायदेशीर वितरण
पंढरपूर शहरात साधारणपणे १००० टन धान्याचे बेकायदेशीर वितरण हाेत असल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत तहसीलदारांना वारंवार फोन करून देखील त्यांनी फोन उचलला नाही. प्रांताधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित पुरवठा अधिकारी व पोलिस प्रशासनाला या ठिकाणी पाठवले. तहसीलदार ठेकेदारांना पाठिशी घालून अवैध धंदे करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द झाला करुन तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते साईनाथ बडवे यांनी केली आहे.
शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर आहे. पंढरपूरपासून जवळ कोर्टी हद्दीत शासकीय धान्य खासगी वाहनातून भरून इतरत्र नेले जात असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले आहे. पुरवठा विभाग आणि पोलिसांनी धान्याचे दाेन ट्रक ताब्यात घेतले आहेत. प्रथमदर्शनी धान्याचा काळाबाजार झाल्याचा अंदाज आहे.
– बालाजी पुदलवाड, नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी.
आम्ही भाड्याने जागा घेऊन मोकळ्या जागेत रेशनचे धान्य वितरित करीत आहोत. या ठिकाणी आमचे सुरक्षा रक्षक असल्यामुळे काही अडचण येत नाही.
-परशुराम सयाजी हजारे, वाहतूक ठेकेदार.