फोटो सौजन्य - Social Media
नालासोपारा : मैदानात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी नालासोपारा पूर्वेतील वलईपाडा येथे घडली. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या मुलाने पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्यात पावसाचा जल्लोष, सोलापुरात काळे ढग अन् कोरडी जमीन; शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडे
पेल्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील गरळपाडा येथील जयअंबे चाळीत राहणारा नमन केसरवाणी (१३) हा सोमवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या पाच मित्रांसह वलईपाडा येथील मोकळ्या मैदानात गेला होता. मुसळधार पावसामुळे या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याला जलाशयाचे स्वरूप आले होते. सहाही मुले त्या पाण्यात पोहण्यासाठी उतरली.
पोहत असताना नमनचा अचानक तोल गेला आणि तो पाण्याखाली गेला. मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दिसून न आल्याने घाबरलेल्या मुलांनी बाहेर येऊन स्थानिकांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक आणि पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या शोधमोहीमेनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास नमनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
या मैदानात पावसाचे पाणी साचले असले तरी त्यामध्ये पूर्वीपासून एक खोल खड्डा होता. त्याच खड्ड्यात बुडाल्याने नमनचा मृत्यू झाला, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शाळेला सुट्टी असल्याने परिसरातील मुले तेथे फिरण्यासाठी आली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली.






