सौजन्य - सोशल मिडीया
नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास १३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून, सुमारे १०६ कोटी २५ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सात लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती (बेबाक) प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सावे यांनी पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातही प्रभावीपणे अंमलबजावणी
शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १,८५९ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये इतकी रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. ही रक्कम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करून त्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र दिले आहे.



