सासवड : नारायण महाराज यांनी आयुष्यभर कोणताही स्वार्थ ठेवला नाही अथवा चुकीचे काम केले नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा यांना कोणताही थारा न देता जनतेला कायम सत्याच्या मार्गाने चालण्याचा मंत्र दिला. भक्ती आणि शक्तीच्या जोरावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते हा त्यांनी दिलेला मंत्र आणि शिकवण सर्वांनी आत्मसात करून आयुष्यभर वाटचाल करावी, असे भावनिक आवाहन श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्त मंदिराचे परमपूज्य नारायण महाराज यांनी देशात दत्त मूर्तींचे चार धाम निर्माण करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प नुकताच पूर्ण झाला असून या निमित्ताने श्री नारायणधाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्रामध्ये मंदिरातील सर्व शिष्यगण यांच्या वतीने संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराजांना रुद्राक्षमाला, मोत्याचा हार, चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या. तसेच भारताच्या नकाशावरील श्री दत्त मूर्तीचे चित्र असलेले स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यावेळी क्षीरसागर बोलत होते.
क्षीरसागर, भोरकर, डोंगरे यांचा गौरव
महाराजांच्या संकल्पपूर्तीमध्ये मोलाचे योगदान देणारे भरत क्षीरसागर, पोपटमहाराज भोरकर आणि श्री नारायणधाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्राचे डॉ. उमेशकुमार डोंगरे यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विश्व परिषद संघाचे केंद्रीय महामंत्री महेंद्र वेदपाठक, इंदौरचे नाना महाराज तराणेकर, डॉ. संजय रावळ डॉ. दिलीप वाघोलीकर, प्रकाश बाफना, श्री. पायगुडे त्याचप्रमाणे नारायणपूर येथील शिष्यगण आणि चार धाममधील मान्यवर उपस्थित होते.






